Breaking

गुरुवार, जुलै १४, २०२२

बनावट खत प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल !

 



मोहोळ : बनावट खते तयार करून विक्री करणाऱ्या दोघांविरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून बनावट खत आणि अन्य साहित्य देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. 


नकली बनावटीची खते, औषधे, बियाणे यामुळे शेतकरी सतत अडचणीत आणि संकटात येत असतो परंतु अशा प्रकारचा नकली बाजार सुरूच असल्याचे अनेकदा समोर येते. असे धंदे करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या अनेकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले आहे तरी देखील असे प्रकार घडत असल्याचे दिसून येते. मोहोळ तालुक्यात अशाच प्रकरणी दोघा संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे मोहोळ तालुका आणि परिसरात देखील खळबळ उडाली आहे. 


बनावट विद्राव्य खते तयार करून विक्री केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळ येथील वैभव विजय काळे आणि ढोक बाभूळगाव येथील राहुल शेंडगे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्यांना अटक देखील केली आहे. शिवाय त्यांच्याकडून पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.  


मोहोळ येथील एका शेतकऱ्याने १२/३१/० हे नकली बनावटीचे खत मोहोळ येथे विकले जात असल्याची तक्रार पुण्याच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे केलेली होती शिवाय आपण या खताच्या दोन पिशव्या खरेदी केल्याचे देखील त्यांनी म्हटले होते. अशा विद्राव्य खताच्या पिशव्यांचा पुरवठा करणारा मोहोळच्याच एका ट्रक्टर शो रूममध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तंत्र अधिकारी यांनी मोहोळ येथे येऊन पोलिसांची मदत घेत सदर शोरूममध्ये गेले आणि तेथून त्यांनी राहुल शेंडगे याला आपल्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरु केली. (Register Crime against both in fake fertilizer case) यावेळी त्याने हे खत आपण मोहोळ येथील वैभव विजय काळे याच्याकडून घेत असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच सदर अधिकाऱ्यांनी काळे याला ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी सुरु केली. 


या चौकशीत काळे यांनी माहिती देत मोहोळ येथील नाईकवाडी वस्तीवरील पोल्ट्री फार्मच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे बनावट खत तयार केले जात असून तेथेच त्याचे पॅकिंग केले जात असल्याचे सांगितले. शेतकऱ्याने केलेली तक्रार ही सत्य असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आले आणि पुढील अधिक तपासणी सुरु करण्यात आली. अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले असता विद्राव्य खताच्या ५० किलो वजनांच्या चार पिशव्या, सदर पिशव्या सील करण्याची दोन एन्ट्री, वजन काटा, दोरा असे साहित्य त्यांना आढळून आले आणि त्यांनी ते साहित्य आपल्या ताब्यात घेतले.  


 'यारा" नावाच्या कंपनीच्या विद्राव्य खतांची नक्कल करीत खत तयार करून बॅगेत भरून विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले शिवाय सदर खताचे विक्री केल्याचे कसलेही रेकॉर्ड ठेवलेले नाही त्यामुळे खत नियंत्रण आदेशानुसार दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यानंतर मोहोळ पोलिसांनी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे . या घटनेने मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.


 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा