Breaking

बुधवार, मे १८, २०२२

खेळता खेळता गळफास, बारा वर्षीय बालकाचा मृत्यू !

 



मोबाईल गेम आणि यु ट्यूब व्हिडीओ पाहून तशीच कृती करताना खेळता खेळता बारा वर्षीय मुलाला गळफास बसला आणि यातच त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची करुण घटना समोर आली आहे. 


अलीकडे मुलांना मोबाईलचे व्यसनच लागले असून मैदानातील खेळ काळाच्या पोटात अदृश्य होताना दिसत आहेत. मैदानी खेळ नसल्यामुळे वाढत्या वयात मुलांच्या शरीराला व्यायाम मिळत नाहीच पण मोबाईलच्या वेडामुळे मुलांत अनेक व्याधी निर्माण होताना दिसू  लागले आहे. मुलांच्या डोळ्यावर विपरीत परिणाम झाल्याची अनेक उदाहरणे असून काही मुलांची बोटे आखडली असल्याचे समोर आले आहे. वडील आपल्या उद्योग व्यवसायास जातात आणि आई आपल्या कामात अडथळा नको म्हणून मुलांच्या हाती मोबाईल देवून त्यांना गप्पा करते. घरोघरी असे चित्र दिसत असतानाच अत्यंत भयावह घटना समोर आली आहे. 


खामगाव तालुक्यातील बारा वर्षे वयाच्या पूर्वेश वंदेश आवटे या मुलाचा असाच अत्यंत दुर्दैवी आणि करून अंत झाला आहे. पूर्वेश हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. पूर्वेशचे वडील खाजगी कंपनीत काम करतात आणि मिळालेल्या वेळेत ते भाजीपाला विक्रीच्या व्यवसाय करीत असतात. त्यांच्या एका मुलीचा  मृत्यू दोन वर्षापूर्वीच झाला आणि आता पूर्वेश देखील त्यांना सोडून गेल्याने आवटे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. घराच्या पाठीमागील बाजूस खेळायला गेलेला पूर्वेश परत आलाच नाही. खेळता खेळता त्याच्या गळ्याला फास लागला आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 
प्राप्त माहितीनुसार पुर्वेशचे वडील नेहमीप्रमाणे कंपनीत काम करण्यासाठी गेले असताना घरात पूर्वेश आणि त्याची आई असे दोघेच होते. खेळायला जातो असे सांगून पूर्वेश घराच्या मागील बाजूस गेला. तेथे त्याने एका लोखंडी पाईपला रुमाल बांधला आणि त्याच्यासोबत तो खेळू लागला. अशा प्रकारे खेळत असताना त्याला अचानक फास लागला गेला. हा प्रकार आईच्या लक्षात येताच आईने त्याला त्वरित खाली काढले आणि पुर्वेश्च्या वडिलांना तातडीने याची माहिती दिली. (Mobile game Tragic death of a child) त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी बारा वर्षे वयाच्या पूर्वेशला मृत घोषित केले. 


मोबाईल गेम पाहून --
पूर्वेशला मोबाईल गेम खेळायची आवड होती तसेच यु ट्यूब वरील साहसी व्हिडीओ पाहून तशीच कृती करायचा प्रयत्न तो नेहमी करायचा अशी माहिती या घटनेनंतर समोर आली आहे. येथेही त्याने असाच काही प्रयत्न केला आणि त्यातच त्याला गळफास लागला गेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मुलांचे मोबाईल वापरणे हे या घटनेने तर पालकांसाठी अधिक चिंतेचे ठरू लागले आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा