Breaking

गुरुवार, मे १९, २०२२

तेरा महिन्यांचे खोंड, बारा लाखाला मागणी तरीही --

 



सांगोला : तेरा महिन्याच्या खोंडाला बारा लाख रुपयात मागणी झाली परंतु तरीही मालकाने खोंड विकले नसल्याची घटना महालक्ष्मी यात्रेतून समोर आली असून या खोंडाला पाहण्यासाठी देखील पशुप्रेमींची गर्दी झाली.  


राज्यात विविध यात्रांच्या निमित्ताने जनावरांचे बाजार भरत असतात आणि यातील काही बाजार लौकिकप्राप्त झालेले आहेत. घोड्यांचे बाजार हे नेहमी चर्चेचे विषय ठरतात आणि या बाजारात मोठ्या किमतीला घोड्यांची खरेदी विक्री होत असते परंतु बैलांच्या बाजारात देखील असे थक्क कराणारे आकडे अलीकडे समोर येत आहेत. विशेष म्हणजे मोठ्या रकमेला मागणी करूनही विक्री केली जात नसल्याचेही अनेकदा दिसून येते. महालक्ष्मी यात्रेनिमित्त सांगोला तालुक्यातील जनावरांचा बाजार देखील मोठ्या प्रमाणात भरत असतो आणि या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होता असते. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून व्यापारी येथे दाखल होत असतात तसेच राज्याच्या विविध भागातून जनावरे येथे विक्रीसाठी आलेली असतात. याच बाजारात तेरा महिन्यांच्या खोंडाला बारा लाख रुपयात मागणी झाली. 


महालक्ष्मी यात्रेत पंढरपूर, सोलापूर, सांगली सातारा, पुणे, नगर इत्यादी परिसरातून पाच हजार जनावरे दाखल झालेली होती. विशेष म्हणजे कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात हा बाजार भरला नव्हता त्यामुळे यावेळी चांगला प्रतिसाद दिसून आला. काही बैलांच्या जोड्या तर यात्रेचे आकर्षण ठरून गेले होते. वळूपालक नितीन देशमुख यांच्या १३ महिन्याच्या खोंडाला तब्बल १२ लाख रुपये किंमत देवून मागणी झाली परंतु देशमुख यांनी हे खोंड विकले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या प्रदर्शनासाठी आपण हे खोंड ठेवले असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 


खिलार विक्री अधिक 
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठलेली असल्याने विविध भागात अशा शर्यती होत आहेत. त्याचा परिणाम या बाजारावर दिसून आला. खिलार खोंड आणि खिलार जोडींची विक्री या बाजारात मोठ्या प्रमाणत झाली आणि खिलार जनावरांच्या या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल देखील झाली आहे.


अधिक बातम्यांसाठी >>> येथे क्लिक करा !     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा