Breaking

शुक्रवार, मे २०, २०२२

अखेर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित !



गेल्या काही दिवसांपासून वाजत गाजत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला असून राज ठाकरे यांनीच ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले असून त्यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याची टीका देखील अत्यंत प्रखरपणे होत आहे. मराठीचा मुद्दा सोडून मशिदीवरील भोंग्याचाच आवाज अधिक होऊ लागल्याने प्रथमच मनसे समाजमनात अडचणीत सापडली आहे. काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. भाजपच्या विरोधात बोलणारे राज ठाकरे हे आता भाजपविषयी अवाक्षर काढताना दिसत नाहीत. महागाई विक्रमी स्वरुपात भडकली असल्याने सामान्य माणूस हैराण झालेला असतानाही वाढत्या महागाईबाबत एक शब्द बोलायला राज ठाकरे तयार नाही याची देखील सामान्य नागरिकात मोठी चर्चा आहे. भाजप नेते मात्र राज ठाकरे यांचे कौतुक करू लागले आहेत त्यातच राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा घोषित केला आणि गेल्या काही दिवसांपासून हा दौरा भलताच वाजत गाजत आहे. 


राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा घोषित केल्यापासून उत्तर प्रदेशात देखील या विषयावर राजकारण सुरु झाले आहे. उत्तर प्रदेशासह मुंबईत देखील राज ठाकरे यांच्या या दौऱ्यास विरोध होत आहे. मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी फेरीवाले,  टॅक्सीवाले, कष्टकरी आणि मजूर यांची माफी मागावी अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उत्तर भारतीयांना झालेली मारहाण आता ऐरणीवर आलेली असून उत्तर प्रदेशात देखील मोठा आणि प्रखर विरोध होत आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदा बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे याना इशारा तर दिलाच आहे पण उत्तर प्रदेशात राज ठाकरे याना पाय ठेवू दिला जाणार नाही असे ते रोज सांगत आहेत. ( Raj Thackeray's Ayodhya visit postponed) उत्तर भारतीयांची आधी माफी मागावी आणि मगच उत्तर प्रदेशात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे त्यामुळे हा दौरा आणि दौऱ्याचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून भलतेच गाजत आहे. 


राज ठाकरे यांचे मौन 
उत्तर प्रदेशात बृजभूषण सिंह हे भाजप खासदार रोजच पत्रकारांशी बोलताना अत्यंत आक्रमकपणे राज ठाकरे यांच्या दौऱ्यास विरोध करीत आहेत त्यामुळे वातावरण तापलेले आहे. या विरोधाबाबत मात्र राज ठाकरे यांनी मौन बाळगले असून याबाबत चकारशब्द देखील काढलेला नाही. प्रखर विरोध होत असताना दौऱ्याची तयारी मात्र सुरु असल्याचे दिसत होते. 


अचानक दौरा स्थगित !
उत्तर प्रदेशात विरोधी वातावरण असताना दौरा होणारच असे सांगितले जात होते पण राज ठाकरे यांनी अचानक हा दौरा स्थगित केला आहे. ठाकरे यांनी ट्विट करून स्वतःच ही माहिती दिली आहे तथापि हा दौरा स्थगित केला असला तरी त्याचे कारण मात्र देण्यात आले नाही. दौरा अचानक स्थगित झाल्याने मात्र राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. पुणे येथे त्यांची २२ मे रोजी सभा असून यावेळी याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. 


आम्ही मदत केली असती !
दरम्यान शिवसेनेने त्यांच्या दौऱ्याची खिल्ली उडवली असून 'आम्हाला सांगितले असते तर आम्ही दौऱ्याला सहकार्य केले असते' असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. अयोध्येत शिवसेनेचे नेहमीच स्वागत होत असते आणि शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग उत्तर प्रदेशात आहे त्यामुळे काही सहकार्य हवे असते तर आम्ही केले असते असा टोला राऊत यांनी लावला आहे. 


हे जरूर वाचा : >>>


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा