Breaking

बुधवार, मे १८, २०२२

बॅटरीवर चालतोय दहा तास ट्रॅक्टर !

  


डिझेलचे दर परवडत नसल्याने काही शेतकरी ट्रॅक्टर सोडून पुन्हा बैलाची मदत घेऊ लागले असतानाच गुजरातच्या एका तरुणाने बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर बनवला असून तो एकदा चार्ज केला की दहा तास चालत आहे. 


आधीच वेगवेगळ्या अडचणींचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्याला आता डिझेल दर वाढीचा मोठा फटका बसला आहे. अधुनिक शेती करण्याकडे बहुतेक बळीराजाचा कल असून शेतकरी आता शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा सर्रास वापर करीत आहे. आर्थिक अडचणीत असला तरी अत्यावश्यक असल्यामुळे शेतकरी कर्ज काढून अथवा अन्य काही पर्याय शोधून ट्रॅक्टर घेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून शेतीसाठी हा ट्रॅक्टर गरजेचंच बनला आहे. पूर्वी बैलांची मदत घेऊन शेती केली जात होती पण आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे आणि विविध कामासाठी त्याचा उपयोग होत आहे. 


शेतकरी बांधवासाठी आवश्यक असलेला ट्रॅक्टर आता मात्र शेतकऱ्यांना न परवडणारा बनू लागला आहे. विविध अडचणीतून शेतकरी एकवेळ ट्रॅक्टर घेऊ शकतो पण वाढलेल्या डिझेलच्या दरामुळे तो शेतात चालविणे कठीण होऊन बसले आहे. डिझेलचे दर सतत वाढत असल्याने शेतकऱ्यांना ते आवाक्याबाहेचे वाटू लागले आहे. काही शेतकऱ्यांनी तर पुन्हा शेतीच्या कामासाठी बैल जुंपायला सुरुवात देखील केली आहे पण अशा संकटाच्या काळात गुजरातमधील जामनगर येथील एका तरुणाने चक्क बॅटरीवर चालणार ट्रॅक्टर बनवला आहे त्यामुळे त्याला डिझेल - पेट्रोलची गरज उरलेली नाही. इंधनाचे दर प्रचंड वाढू लागल्यामुळे अलीकडे इलेक्ट्रिक वाहने घेण्याकडे कल वाढलेला असतानाच आता शेतीच्या कामासाठी देखील ट्रॅक्टर बॅटरीवर चालणार आहे. 


गरज ही शोधाची जननी आहे अशी म्हण पूर्वीपासून प्रचलित आहे. प्रत्येक शोध गरजेतूनच लागत आलेला आहे तसे बॅटरीवरील ट्रॅक्टरच्या बाबतीत देखील घडले आहे. जामनगर जिल्ह्यातील कलावाड तालुक्यातील पिप्पर गावाच्या ३४ वर्षे वयाच्या महेशने असा ट्रॅक्टर तयार केला आहे. त्याने या ट्रॅक्टरला 'व्योम' असे नाव दिले आहे.  या ट्रॅक्टरची समाज माध्यमावर मोठी चर्चा देखील सुरु झाली आहे. महेश हा शेतकऱ्याचा मुलगा असून शेतीतील अडचणी आणि शेतकऱ्याची परिस्थिती याची त्याला पूर्ण जाणीव आहे. (Tractor running on batteries for ten hours) इंधनाच्या वाढत्या किमतीला वैतागून त्याने विचार केला आणि त्यातून त्याने असा बॅटरीवरील एक ट्रॅक्टर बनवला.  


दहा तास काम करतो 

२२ एच पी क्षमता असलेला हा ट्रॅक्टर ७२ वॅट लिथियम बॅटरीद्वारे चालविला जातो, उत्तम गुणवत्तेच्या बॅटरी त्याने या ट्रॅक्टरमध्ये बसविल्या असल्याने त्या वारंवार बदलण्याची गरज नाही. सदर ट्रॅक्टर पूर्णपणे चार्ज होण्यासाठी चार तास लागतात आणि एकदा पूर्ण चार्ज झाला की तो तब्बल दहा तास काम करतो. 

  

फोनवरून नियंत्रण !

हा ट्रॅक्टर बनवताना महेशने अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि  नवीन वैशिष्ठ्यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विशेषतः या ट्रॅक्टरचा वेग फोनवरून नियंत्रित करता येतो. एक मोटार देखील देण्यात आली असून जेंव्हा पाण्याची गरज असते तेंव्हा तिचा वापर करता येतो शिवाय या ट्रॅक्टरमुळे प्रदूषण देखील होत नाही.    


हे देखील वाचा >>>

   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा