Breaking

मंगळवार, मे १७, २०२२

हात तोडून हातात देईन ! खा. सुप्रिया सुळे संतापल्या !



जळगाव :महाराष्ट्रात यापुढे महिलेवर कोणत्याही पुरुषाने हात उगारला तर त्याचा हात तोडून त्याच्याच हातात देईन असा संतप्त इशाराच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. 


पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावरील पुस्तकाच्या प्रकाशनाचा हा कार्यक्रम होता. यावेळी स्मृती इराणी बालगंधर्व रंगमंदिरात पोहोचल्या तेंव्हा राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या विषयावर आंदोलन केले आणि घोषणाबाजी सुरु केली. राष्ट्रवादीचे हे आंदोलन पाहून भाजपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आणि वेगळाच राडा सुरु झाला. पोलीस राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना तेथून बाहेर नेत असताना भाजप कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यावर हात उगारल्याचे दिसून आले. हा प्रकार चित्रित देखील झालेला आहे. दरम्यान डेक्कन पोलीस ठाण्यात महिलांना मारहाण आणि विनयभंग केल्याची तक्रार डेक्कन पोलिसात दाखल झाली असून भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

आंदोलन करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण आणि विनयभंग केल्याच्या या प्रकरणी राज्यात चर्चा होऊ लागली असून महिलांच्या अंगावर गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रचंड संताप आहे. याच विषयावर राष्ट्रवादीच्या खासदर सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक होत इशारा दिला आहे. खा. सुप्रिया सुळे या अत्यंत संयमी लोकप्रतिनिधी असून त्याचा प्रत्यय विविध घटनातून समोर आलेला आहे. सुप्रिया सुळे या अकारण संतापलेल्या दिसत नाहीत. कुठल्याही प्रसंगी अत्यंत संयमी पद्धतीने आपले मत त्या व्यक्त करीत असतात पण पुण्यातील या घटनेवर मात्र त्यांनी आक्रमक इशारा दिला आहे. जळगाव येथे महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले यावेळी खा. सुळे उपस्थित होत्या. (MP Supriya Sule got angry) पदाधिकारी यांच्याशी बोलताना त्यांनी हा इशाराच देवून टाकला आहे. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या ---

"शाहू फुले आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे, या राज्यात महिलांचा सन्मान करण्याची शिकवण आपल्याला मिळालेली आहे. यापुढे कुठल्याही पुरुषाने महिलांच्या अंगावर हात उचलला तर मी तिथे जाईन, त्याच्याविरोधात न्यायालयात जाईन.त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन,  काय लावलं आहे हे ? " 


महागाईचा निषेध 

देशातील महागाई कमी करू असे सांगत केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले पण गेल्या आठ वर्षात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांची प्रचंड दरवाढ केली गेली. सामान्य जनतेचे या महागाईने कंबरडे मोडले आहे असे सांगत खा. सुप्रिया सुळे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा