Breaking

सोमवार, मे १६, २०२२

सोने कारागिरच सोळा लाखांच्या दागिन्यासह पळाला !

 



सोलापूर : सराफांनी दागिने करण्यासाठी दिलेले सोळा लाखांचे सोने घेवून सुवर्ण कारागीरानेच पळ काढला असून तीन सराफांची मोठी फसवणूक झाली आहे आणि या घटनेने सुवर्ण व्यावासायिकांत खळबळ उडाली आहे.


हल्ली कोण आणि कशी चोरी करील हे सांगता येत नाही. घरातील दागिन्यावर चोर डल्ला मारतातच पण रस्त्यावर जाताना कुणी गळ्यातील दागिने हिसकावून पळून जाते तर कुणी आपण पोलीस असल्याची बतावणी करीत अंगावर असलेले दागिने लंपास करतात. चोरांचे वाढते प्रताप पाहता सोन्याचे दागिने अंगावर घालून मिरवणे आता सोपे राहिले नाही. अनेक महिला मात्र इतरांना दिसतील अशा पद्धतीने अंगावर लाखोंचे सोने घालून कुठेही वावरत असतात त्यामुळे चोरांना आयतेच निमंत्रण मिळते. (The jewelry maker committed the theft) अशा चोऱ्या या आता सामान्य झाल्या असताना चौकीदारानेच चोरी करावी असा प्रकार सोलापुरात घडला आहे.

 

सोन्याच्या दुकानात ग्राहकांनी दागिन्यांच्या डिझाईनची पसंती केल्यानंतर तशा प्रकारचे दागिने बनविण्यासाठी कारागीराकडे सोने दिले जाते. या सोन्याचे ग्राहकांना हवे तसे दागिने तयार करून हे कारागीर देत असतात. सोलापुरातील एक कारागिराने मात्र दागिने बनवून परत देण्याच्या ऐवजी ते सोने घेवून पोबारा केला आहे त्यामुळे सराफ व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. (Solapur Crime) तीन सराफांची फसवणूक एका कारागिराने केली असून या प्रकरणी आसिफ बशीर शेख यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


मुळचा पश्चिम बंगाल मधील काझीपाडा येथील सर्फराज सल्लाउद्दीन काझी हा सराफांना दागिने तयार करून देत असायचा. गेल्या तीन चार वर्षांपासून सोलापूरच्या पूर्व मंगळवार पेठेत तो दागिने बनवून देत होता. अरमान ज्वेलर्स चे आसिफ शेख यांनी यापूर्वीही त्याच्याकडून दागिने बनवून घेतले होते. त्याप्रमाणे शेख यांनी ७० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे नेकलेस तयार करण्याची ऑर्डर सर्फराज काझी याला दिली. २९ एप्रिल रोजी ऑर्डर दिल्यानंतर पुन्हा २ मे रोजी आणखी तेवढीच ऑर्डर दिली त्याशिवाय पन्नास ग्रॅम सोन्याचे मणी तयार करून देण्याची देखील ऑर्डर दिली. 


अन्य दोघांचीही फसवणूक !

आसिफ शेख हे ठरल्याप्रमाणे दागिने आणण्यासाठी गेले असता सर्फराज याचे दुकान बंद असल्याचे दिसले त्यामुळे त्यांनी इतरत्र त्याची चौकशी केली असता दुकान कालपासून बंद असल्याचे त्यांना समजले. त्या परिसरातील सराफ जसीमुद्दीन मलिक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही ४८ ग्रॅम सोने सर्फराज यांच्याकडे दागिने तयार करण्यासाठी दिल्याची माहिती मिळाली. सोपान महिंद्रकर यांनीही ५७ ग्रॅम सोने सर्फराज यांच्याकडे दिल्याची माहिती समोर आली. 


सर्फराज बेपत्ता !

सर्फराजचे दुकान बंद असल्याने आणि त्याबद्धल काही माहिती मिळत नसल्याने चिंता वाढली होती. सदर दुकान ११ मे पासून बंद असून सर्फराज हा बेपत्ता असल्याचे दिसले तेंव्हा मात्र आपली फसवणूक झाली असून सर्फराज सोने घेऊन पळून गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर आसिफ शेख यांनी पोलिसात धाव घेतली. एकूण १६ लाख ३२ हजाराचे सोने घेऊन सर्फराज पळून गेला आणि फसवणूक केल्याप्रकरणी अखेर पोलिसात तक्रार देण्यात आली. 


व्यावसायिकात चिंता !

एकावेळी तीन सराफाना फसविण्यात आल्याने आणि विशेष म्हणजे सुवर्ण कारागिरानेच गंडा घातल्याने व्यावसायिकात मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. दागिने बनविणारे कारागिरच सोने घेऊन पळून चालले तर व्यवसाय कसा करायचा ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

      


हे देखील वाचा :>>


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा