Breaking

गुरुवार, जुलै १४, २०२२

अखेर राज्यातील नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या !

 


मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणूक होणार की नाही याबाबत विविध कयास लावले जात असताना राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 


निवडणूक आणि आरक्षण हा विषय सतत गाजत वाजत राहिला आहे, आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाणार की त्या पुढे ढकलल्या जाणार याबाबत बरीच उलथापालथ सुरु होती. राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याबाबत ८ जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम देखील घोषित करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात मात्र एक विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याची सुनावणी १२ जुलै रोजी झाली होती. यावेळी सरकारने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत दिला असलेल्या एक अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला गेला होता. 


सदर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी १९ जुलै रोजी होणार आहे परंतु या पार्श्वभूमीवर ८ जुलैच्या आदेशानुसार निश्चित केलेल्या राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका याबाबतचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. आता या निवडणुकासाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश दिला जाणार आहे  राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून राज्य निवडणूक आयोगाचे सचिव संजय  सावंत यांनी एका पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व जिल्हाधिकारी यांना दिली आहे.  गेल्या काही काळापासून या निवडणुका सतत कुठल्या न कुठल्या कारणामुळे लटकत राहिल्या आहेत आणि आता त्या पुन्हा एकदा लटकलेल्या आहेत. (Municipal elections postponed in Maharashtra) 


राज्यातील नगरपंचायत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी विविध घटकातून होत होती. ओबीसी आरक्षणाचे कारण देत ही मागणी होत होती शिवाय राज्यात सर्वत्र पडत असलेला पाऊस आणि प्रशासनावर येणारा ताण याचाही हवाला देत निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. २० जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर होणार होता पण आता ही निवडणूक लांबणीवर पडली असून भविष्यात नेमकी कधी निवडणूक होईल याबाबत सद्या काहीही चित्र स्पष्ट नाही.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा