Breaking

गुरुवार, जुलै १४, २०२२

ग्लोबल टीचर डिसले गुरुजींवर कारवाई अटळ !



सोलापूर : मुदतपूर्व राजीनामा दिलेले ग्लोबल टीचर डिसले गुरुजी यांच्यावर आता कारवाई अटळ असल्याचे दिसत असून त्यांनी दिलेला खुलासा दिशाभूल करणारा असल्याचे चौकशी समितीने म्हटले आहे. 


जागतिक पातळीवर गाजलेले सोलापूर जिल्ह्यातील परीतेवाडी येथे कार्यरत असणारे रणजितसिंह डिसले गुरुजी गेल्या काही काळापासून सतत अडचणीत येताना दिसत आहेत. डिसले गुरुजी यांचे जेवढे नाव झाले होते तेवढेच ते वादात सापडले असून शिक्षण विभाग आणि डिसले गुरुजी यांच्यात एक वेगळाच संघर्ष सुरु झाल्याचे गेल्या काही काळापासून समोर येत आहे. शिक्षण विभागाने डिसले गुरुजी यांच्यावर काही आरोप केले आहेत आणि या प्रकरणाची चौकशी देखील झाली आहे. गुरुजींवर कारवाईची तलवार टांगती असतानाचा त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला आहे. गुरुजींवर कारवाई होणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून अधिक वेगाने समोर आलेल्या आहेत आणि याच दरम्यान त्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय घेतल्याने अधिकच गूढ निर्माण झाले आहे. 


डिसले गुरुजी यांची जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्ती करण्यात आली होती परंतु तेथे त्यांनी हजेरी न लावता वेतन मात्र घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून त्याच अहवालाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आहे. डिसले गुरुजी यांनी तब्बल दोनशे पानांचा खुलासा सादर केला आहे आणि अनेक छायाचित्र देखील या खुलाशासोबत जोडले आहेत परंतु त्यांचा हा खुलासा चौकशी समितीने अमान्य केला आहे. सदर खुलासा हा दिशाभूल करणारा असल्याचे चौकशी समितीने म्हटल्यामुळे गुरुजींच्या अडचणी अधिक वाढू लागल्या आहेत. चौकशी समितीच्या अहवालानुसार गुरुजींवर कारवाई होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असतानाच त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेत असल्याचा अर्ज शिक्षण विभागाकडे सादर केला असून यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. 


नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०२० या कालखंडात डिसले गुरुजीना जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेवर प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. या दरम्यान ग्लोबल टीचर डिसले गुरुजी प्रतिनियुक्तीवर काम केले नाही आणि त्या शाळेत ते गेलेच नाहीत अशी बाब उघडकीस आली. याप्रकरणी त्याकाळचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी चौकशी करून सुमारे दोन हजार पानांचा चौकशी अहवाल तयार केला होता. विज्ञान केंद्रावर नियुक्ती असतनाही डिसले गुरुजी तेथे गेले नाहीत आणि हे प्रकरण जावीर समितीने निदर्शनास आणले होते. डिसले यांना सांगितलेले काम न करता त्यांनी आपल्या सोयीने काम केले असल्याचीही बाब चौकशी समितीने समोर आणली.   

  

चौकशी अहवालानुसार डिसले गुरुजी यांच्यावरील कारवाई आता अटळ असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला आहे. परंतु निवृत्तीचा अर्ज दिला असला तरी होणाऱ्या कारवाईवर कसलाच फरक पडण्याचा विषय येत नाही. चौकशी आणि अहवालानुसार कारवाई होईपर्यंत त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर होण्याचीही शक्यता नाही. (Action against global teacher Disley Guruji is inevitable) दरम्यान डिसले यांच्याबाबत चौकशा झालेल्या असून दोन्ही चौकशी समितींचे अहवाल शिक्षण विभागाकडे सादर झालेले आहेत. त्यामुळे त्यानुसार डिसले यांच्यावर योग्य ती कारवाई होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी स्पष्ट केले आहे.  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा