Breaking

बुधवार, जुलै १३, २०२२

आगामी ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा !

 



पुणे : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असताना पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 


यंदा पाऊस वेळेवर आणि भरपूर प्रमाणात असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला होता परंतु जून महिना संपला तरी पावसाने हजेरी लावली नव्हती. आता जुलै महिन्यात मात्र राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत असून नद्या नाल्यांना पूर आलेला दिसत आहे तर धरणांची पाणी पातळी वाढू लागली आहे. राज्यातील अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या असून पावसाने आणि पुराने काही जणांचे बळी घेतलेले आहेत. अशातच आता पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला असून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात येत्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 


पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून पुण्याला तर रेड अलर्ट जारी केला आहे. खडकवासला धरण भरले असून या धरणातून सतत विसर्ग सोडला जात असून पावसाच्या प्रमाणानुसार तो कमी अधिक होत आहे. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला असून नदीच्या काठावर पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. दौंड येथे देखील मोठा विसर्ग सुरु असून भीमा नदी काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरणाची पाणी पातळी खालावल्याने चिंता व्यक्त होत होती परंतु कालच उजनी धारण प्लसमध्ये आलेले आहे आणि धरणात विसर्ग येणे सुरूच आहे. पुणे आणि पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहिला तर उजनी धरण वेगाने भरू लागणार आहे. त्यातच पुण्याला ४८ तासातील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असल्यामुळे उजनीची पातळी झपाट्याने वाढणार असल्याचे दिसत आहे. 


पुणे जिल्ह्यासाठी दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील शाळानाही दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. येत्या ४८ तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी होईल अशी शक्यता हवामान विभागाने देवून पुणे जिल्ह्यास सतर्क केले आहे. पुणे आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचे असून पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांना देखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात तर पाऊस सुरूच असून पंचगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पंचगंगेचे पाणी पात्राच्या बाहेर येण्याची देखील शक्यता आता व्यक्त होत आहे त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य नद्यांच्या पातळीत देखील वाढ झालेली आहे. 


कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात देखील कृष्णा नदीच्या पात्रात वाढ झाली असून अलमट्टी धरणातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. हा विसर्ग सुरु असल्यामुळे कृष्णा नदी अद्याप इशारा पातळीवर पोहोचली न आही परंतु वारणा नदीच्या पात्रात पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे त्यामुळे नद्यांवर मोठा दबाव वाढू लागला आहे.(Warning of heavy rains for western Maharashtra) हवामान विभागाने अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला असल्यामुळे आगामी दोन दिवस हे काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे ठरणार आहेत.   





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा