Breaking

बुधवार, जुलै १३, २०२२

कोरोना लसीचा बुस्टर डोस मिळणार मोफत !


राज्यात आणि देशभरात कोरोनाच्या संसार्गात वाढ होत असून १५ जुलै पासून कोरोना लसीचे बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 


कोरोनाचे रुग्ण सगळीकडेच वाढू लागले असून मोठ्या शहरातून ही वाढ अधिक दिसत आहे. शासनाने कोरोना लस देण्याची मोहीम राज्यात प्रभावीपणे राबवली असून चांगल्या लसीकरणामुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली असल्याचे या आधीच दिसून आले आहे. कोरोनाची तिसरी लाट आली आणि गेली परंतु पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसारखा विनाश तिसऱ्या लाटेने केला नाही. मृत्यूंची संख्याही तुलनेने कमी राहिली. लसीकरणामुळे हे शक्य झाल्याचे सांगितले गेले आहे. आता पुन्हा देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अद्यापतरी हा प्रादुर्भाव अधिक त्रासदायक नसल्याचे दिसत असून आता पुन्हा शासनाने १८ ते ५९ या वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीचे डोस मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 


येत्या १५ जुलै पासून लसीकरणाची एक विशेष मोहीम सुरु करण्यात येणार असून ७५ दिवस चालणाऱ्या य अमोहीमेत कोरोनाचे बुस्टर डोस देखील मोफत दिले जाणार आहेत. सरकारी लसीकरण केंद्रावर हे डोस दिले जाणार आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शासनाने कोरोना बुस्टर डोसला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ही मोहीम अमृत महोत्सवाच्या रुपात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  १८ ते ५९ वयोगटातील ७७ कोटी नागरिकांना प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार असून त्यातील एक टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांना आत्त्तापर्यंत खबरदारीचा डोस देण्यात आला आहे. साठ आणि त्याहून अधिक वयातील सुमारे १६० दशलक्ष पात्र लोकसंख्येपैकी जवळपास २६ टक्के नागरिकांना तसेच आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना डोस मिळालेला आहे.  


दोन्ही डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील प्रतिपिंड पटली सुमारे ६ महिन्यांनी कमी होते आहे अशा परिस्थितीत बुस्टर किंवा खबरदारीचा डोस दिल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत असल्याचे दिसून आले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आईन इतर आंतरराष्टीय संशोधन संस्था यांच्या अभ्यासातून ही बाब दिसून आलेली आहे. त्यामुळे शासनाने ७५ दिवसांसाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे, यात १८ ते ५९ वयातील नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. 


मागील आठवड्यात केंदीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर ९ महिन्यांवरून ६ महिन्यापर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलेला होता. आता १५ जुलै पासून लसीकरणाची ही मोहीम सुरु होत असून (Free booster dose of corona vaccine) नागरिकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  




  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा