Breaking

रविवार, मे १५, २०२२

दोन दिवसात मान्सून अंदमानात पोहोचणार !

 



यावर्षी नियमित वेळेच्या आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून दोन दिवसात मान्सून बंगालच्या उपसागरात दाखल होणार आहे.


यावर्षीचा उन्हाळा अत्यंत कडक असून काही भागात पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट असे विचित्र हवामान सतत राहिले आहे. उष्माघाताचा देखील मोठा त्रास सहन करावा लागत असून तापमान सतत वाढते असल्याने कधी एकदा पावसाला सरुवात होतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. अशी परिस्थितीत आगामी पावसाळा चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. स्कायमेट या हवामान संस्थेनेही यंदा भरपूर पाऊस होणार असल्याचाच अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात देखील या बातमीने दिलासा दिला असून शेतकरी आनंदित आहेत. त्यातच यंदा पावसाला लवकर सुरुवात होईल असे सांगितले जात आहे. त्यानुसार अंदमान आणि केरळ येथे नियमित वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार आहे. 


सद्या बंगालच्या उपसागरात असलेल्या 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असून नैऋत्य मोसमी वाऱ्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे मान्सून दाखल होण्यात अडथळा उरणार नाही. दक्षिण अंदमान आणि बंगाल उपसागरावर मान्सून १५ मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज आधी व्यक्त केला होता. अंदमानात आगामी दोन दिवसात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. प्रत्येकवर्षी  साधारणत: १८ ते २० मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होत असतो, यावेळी मात्र अनुकूल परिस्थितीमुळे पाच दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Monsoon in two days in the Andamans) मध्य पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग, अंदमानचा समुद्र, अंदमान - निकोबार बेटाचे संपूर्ण क्षेत्र पुढील ४८ तासात मान्सून व्यापून टाकण्याची शक्यता आहे. 


केरळमध्येही लवकर 

मान्सूनच्या या प्रगतीमुळे केरळमध्येही मान्सून लवकर म्हणजे वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवाना हा मोठा दिलासा आहे.  मान्सूनच्या प्रगतीत काहीच अडथळे निर्माण झाले नाहीत तर राज्यात आणि देशभरात यावर्षी वेळेत पाऊस होऊ शकेल. जून महिन्यापासूनच चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने या आधीच व्यक्त केला आहे. 



हे देखील वाचा :

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा