पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत असून शेतकऱ्याच्या या राजवाड्यावर कुणाची सत्ता येणार याची प्रतीक्षा आज संपणार आहे परंतु उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची झाली आणि २१ जागांसाठी तब्बल ८० उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले आहे. आज या निवडणुकीची मतमोजणी होत असून तीनही आपलाच विजय होणार असल्याचा दावा करीत आहेत. कुणाच्या दाव्यात किती दम होता हे आज स्पष्ट होणार आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. ५) अतिशय चुरशीने जवळपास ९० टक्के मतदान झाले. कांही ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. आता आज मतमोजणी होत असून कारखान्याचा सभासद नक्की कुणाच्या मागे आहे हेच या निकालातून दिसून येणार आहे. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी ३ पॅनलचे ६३ आणि १७ अपक्षांसह एकूण ८० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बिगर उत्पादक संस्था मतदारसंघात ९०, तर ऊस उत्पादक गटातून २५ हजार ३९२ मतदार मतदानासाठी पात्र होते. एकूण १०५ मतदान केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले आहे.
आपलाच उमेदवार कसा निवडून येईल यासाठी उमेदवारांचे समर्थक आणि उमेदवार यांचीही धावपळ सुरु होती. दुपारनंतर पावसाच्या सरी येत होत्या पण या पावसात देखील मतदारांना मतदान केंद्रापर्यत आणण्याची लगबग पाहायला मिळत होती. या परिश्रमाचे कुणाला किती फळ मिळणार हे काही वेळेनंतर दिसायला सुरुवात होणार आहे. गावोगावच्या मतदान केंद्रांवर याचा प्रत्यय येत होता. भाळवणी गटात सर्वाधिक ९५.३४ टक्के मतदान झाले.त्यापाठोपाठ करकंब गटात ९१.७३ टक्के, सरकोली ९१.०४ टक्के, तुंगत ९०.५१ टक्के,कासेगाव ८७.८० टक्के, तर मेंढापूर गटात ८६.०६ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. पॅनल प्रमुख भगीरथ भालके यांनी सरकोली, युवराज पाटील यांनी येवती, अभिजीत पाटील यांनी देगांव, तर समाधान काळे यांनी वाडीकुरोली येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
सत्ताधारी भगीरथ भालके - कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखालील श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनल, संचालक युवराज पाटील, एड. गणेश पाटील, एड दीपक पवार यांच्या नेतृत्वाखालील श्रीविठ्ठल अण्णा भाऊ शेतकरी विकास पॅनल आणि उद्योजक अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री विठ्ठल परिवर्तन शेतकरी विकास पॅनल यांच्यात अटीतटीचा सामना रंगला असून 'किसने कितना है दम' हे आजच्या निकालातून समोर येणार आहे (Vitthal Sugar Factory election, counting of votes today)
रात्रीपर्यंत निकाल !
आज रेल्वे मैदानाच्या समोर असलेल्या शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होत असून २० टेबलवर ही मते मोजली जाणार आहेत. प्रारंभी केंद्रनिहाय मतपेट्या उघडल्या जाणार असून गट, प्रवर्गानुसार मतपत्रिका वेगवेगळ्या करून त्याचे गट्ठे केले जाणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होत असून शेवटचा निकाल हाती येण्यास रात्र होण्याची शक्यता आहे. निवडणूक अधिकारी नागेश पाटील आणि तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतमोजणी होत आहे. या मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा