Breaking

मंगळवार, जुलै ०५, २०२२

आषाढी महापूजेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण !

 


आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने रितसर निमंत्रण देण्यात आले असून मुख्यमंत्री होताच शिंदे यांना विठूमाऊलीच्या महापूजेचा मान मिळत आहे.


राज्याच्या राजकारणात भूकंप सुरु होता तर दुसरीकडे देहू आळंदी येथून संतांचा पालखी सोहळा पंढरीकडे निघालेला होता. अशाच वातावरणात यावर्षीची आषाढीची शासकीय महापूजा उद्धव ठाकरे करणार की देवेंद्र फडणवीस करणार याची चर्चा सुरु होती आणि उत्सुकता देखील शिघेला पोहोचली होती. नंतरच्या टप्प्यात देवेद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आणि त्यांच्या हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होणार हे निश्चित मानले जात होते. अशा परिस्थितीतच राज्याला आणखी एक राजकीय धक्का बसला आणि देवेद्र फडणवीस यांच्याऐवजी शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर गेलेले आणि भाजपशी हातमिळवणी केलेले एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि महाराष्ट्राचे सगळेच अंदाज फोल ठरले गेले.

 
मुख्यमंत्री होताच एकनाथ शिंदे यांना पंढरीच्या विठूमाऊलीची आषाढीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळत असून मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांना महापूजेचे निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे आणि निमंत्रणाचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ट्वीट करून याबाबत माहिती दिली असून "श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडूरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला" असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे 
 


मुख्यमंत्र्यांना मंदिर समितीच्या वतीने महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी आणि मंदिर समिती कार्यकारी अध्यक्ष गजानन गुरव, समिती सदस्या शकुंतला नडगिरे आदी उपस्थित होते अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दुसऱ्या एका ट्वीट मधून दिली आहे.


संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीच्या समिप आला असून अवघी पंढरी आषाढीच्या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच पंढरीत भाविकांची गर्दी दिसू लागली आहे तर पंढरीकडे येणारे सगळे रस्ते भाविकांनी आणि भगव्या पताकांनी फुलून गेले आहेत. (Invitation to Chief Minister Eknath Shinde for Ashadi Mahapuja) येत्या १० जुलै रोजी आषाढी एकादशी असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ जुलै रोजी सायंकाळी पंढरीत दाखल होण्याची अपेक्षा आहे. कोरोनाच्या आक्रमणामुळे गेल्या दोन वर्षांपासून भाविकांना पंढरीच्या वारीचा सोहळा अनुभवता आला नाही. भाविकांची इच्छा असूनही कोरोनाने त्यांचे पाय आणि मन देखील बांधून ठेवले होते. यावेळी मात्र कोरोनाच्या सावटात आषाढी यात्रा साजरी होत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा