Breaking

रविवार, जून ०५, २०२२

सोलापूर जिल्ह्यात गुरुजीना शाळेत मोबाईल बंदी !



सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील गुरुजी मंडळीना आता शाळेत मोबाईल वापरण्याची बंदी करण्यात येणार आहे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हे निर्बंध लागू केले आहेत.


कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मोबाईलवरच शाळा भरत होती आणि अभ्यासाचे मुख्य माध्यम हे  मोबाईलच बनले होते. शिक्षक आणि विद्यार्थी हे केवळ मोबाईलच्या माध्यमातूनच काम करीत होते. शिक्षणासाठी अत्यंत महत्वाचा बनला गेलेला मोबाईल आता शिक्षकांनाच शाळेत वापरता येणार नाही. विविध शासकीय कार्यालयात कर्मचारी कामापेक्षा मोबाईलमध्येच गुंतलेले पाहायला मिळत असतात, सरकारी काम करण्याच्या वेळेत काही कर्मचारी मोबाईलवर गप्पा मारताना दिसतात. कामासाठी गेलेल्या नागरिकांना देखील त्यांच्या गप्पा संपेपर्यंत वाट पहावी लागते. गप्पा नसल्या तरी काही कर्मचारी मोबाईलशी खेळत बसलेले दिसतात. या प्रकाराबाबत आजवर अनेकदा जनतेची नाराजी समोर आली आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकावर मात्र आता मोबाईल वापरास बंदी करण्यात आली आहे. 


कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे आधीच  मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्याची मोठी जबाबदारी शिक्षक मंडळीवर आहे. शिक्षकांच्या मोबाईलमुळे अध्यापनावर परिणाम होऊ नये आणि मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध प्रयत्न सुरु केले आहेत.  अध्यापन करीत असताना प्राथमिक शिक्षकांना मोबाईल वापरता येणार नाही. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून काढून मुलांना स्पर्धाक्षम बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी कार्यकारी अधिकारी यांनी एक आराखडा देखील तयार केला आहे. (Teachers banned from using mobile phones)


शिक्षकावर ठेवणार "लक्ष" ! 
शाळेच्या वेळेत शिक्षकांना मोबाईल वापरण्यास निर्बंध लावले जाणार असून मुख्याध्यापकांच्या माध्यमातून याची अंमलबजावणी केली जाणार आहे शिवाय शाळा व्यवस्थापन समिती याकडे बारकाईने लक्ष ठेवणार आहे. शिक्षक वर्गात शिकवत असताना त्यात व्यत्यय येऊ नये यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. या निर्णयाचे पालकातून मात्र स्वागत केले जात आहे.  
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा