Breaking

रविवार, जून ०५, २०२२

पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज !

 



सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.


राज्यात यावर्षी लवकर म्हणजे नियमित वेळेच्या आधीच मान्सून दाखल होईल असे हवामान विभागाकडून वेळोवेळी सांगण्यात येत होते. मान्सून अंदमानात वेळेच्या आधीच दाखल झाला आणि काहीसा रखडत तो वेळेपूर्वीच केरळमध्येही दाखल झाला परंतु पुढचा प्रवास मात्र रखडला आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब लागू लागला आहे. ५ जून पर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता परंतु प्रत्यक्षात मोसमी पाऊस दाखल झाला नाही आणि वेळेपूर्वी तो दाखल होण्याची शक्यता देखील आता मावळल्यासारखीच आहे. (Rain for the next five days) तथापि, आजपासून पुढील पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


राज्यात मान्सूनपूर्व पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली असतानाच पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रासाठी तीव्र हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात मात्र काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे उष्णता आणि पाऊस यापासून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.  पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण तसेच मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. महाराष्ट्रातील काही भागात हा पाऊस होणाची शक्यता असून सावधगिरी बाळगावी, विशेषत: किनारपट्टीवरील नागरिकांनी सावध असावे असा इशारा देण्यात आला आहे.



अनुकूल परिस्थिती

पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीत पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून येत्या काही दिवसांत आणखी परिस्थिती अनुकूल होणार आहे. विदर्भाचा भाग वगळता राज्यातील इतर भागात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावसामुळे जोरदार वारा देखील वाहू शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 


विविध जिल्ह्यात पाऊस 

सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यात आगामी चार ते पाच दिवस जोरदार पाउस होईल असे हवामान विभागाचे अनुमान आहे. विदर्भ परिसरात मात्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा