Breaking

शुक्रवार, जुलै ०८, २०२२

आषाढी यात्रेत होणार फायर ऑडिट आणि हॉटेल तपासणी !

 



पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने प्रशासन सज्ज असून यात्रा कालावधीत महत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या हॉटेलचे तसेच अन्य ठिकाणी फायर ऑडिट आणि हॉटेलमधील अन्नपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. 


आषाढी यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा असतानाच पंढरी गजबजू लागली आहे. दिंड्या पालख्या घेऊन पायी प्रवास करून भाविक पंढरीत दाखल होत आहेत तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा देखील पंढरीच्या समीप येत आहे. पंढरीचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले असून अवघी पांढरी भक्तिमय आणि भगवी होताना दिसत आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच त्यांना सर्व त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनातील सर्व विभाग नेटाने प्रयत्न करीत आहेत. रविवारी आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार असून पंढरीकडे येणारी वाहने भरभरून येताना दिसत आहेत. राज्य परिवहन महामंडळ आणि रेल्वेने जादा गाड्या सोडून भाविकांची सोय केलेली आहे. 


यात्रेच्या काळात सुरक्षेबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात भाविकांची गर्दी असते तसेच जागोजागी तात्पुरती हॉटेल्स उभारण्यात आलेली असतात. आगीसारखी काही घटना घडली तर मोठी दुर्घटना होण्याची भीती असते त्यामुळे फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Fire audit will be held during Ashadi Yatra) यात्रेत विकल्या जाणाऱ्या दीडशे किलो पिढ्यात भेसळ आढळून आली असून अन्न व औषध प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांवर कारवाई केली आहे. फायर ऑडिट करण्यासोबतच हॉटेलमधील अन्न पदार्थाचीही तपासणी वेळच्या वेळी करण्यात यावी अशा सूचना देखील जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 


सोलापूर येथे नियोजन भवनमध्ये जिल्ह्यातील कामकाजाबाबत व आषाढीवारी तयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता संजय माळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, महावितरणचे अधीक्षक अभियंता सांगळे आदी उपस्थित होते.

 

जिल्ह्याचे पालक सचिव वाघमारे यांनी मान्सून बाबतची पूर्वतयारी, आषाढीवारी तयारी, सद्यस्थितीतील कोरोना स्थिती, पीक कर्ज वाटप, महावितरण, कषी विषयक बाबींचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, आषाढी वारीमध्ये सर्व प्रकारची जनता असते, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. पावसामुळे वृद्ध वारकऱ्यांचे हाल होऊ नये, यासाठी नियोजन करावे. महिलांच्या समस्येबाबत जिल्हा प्रशासनाने माता-बाल स्वास्थ्य, हिरकणी कक्ष स्थापन केल्याचे कौतुकही त्यांनी केले. 


सद्यस्थितीमध्ये पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांना बी बियाणे, खते यांची कमतरता भासणार नाही, या दृष्टीने नियोजन करावे, शेतकऱ्यांकडून खरीप पिकांचा पीक विमा जास्तीत जास्त प्रमाणात उतरून घ्यावा. याबाबतची माहिती देखील पालक सचिवांनी घेतली आणि सूचनाही करण्यात आल्या. कोविडचे लसीकरणाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांचे मनपरिवर्तन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. बुस्टर 'डोसबाबतही नागरिकांना सतर्क करावे अशा सूचना देखील या बैठकीत करण्यात आल्या आहेत. 


दर्शनाची रांग लांबू लागली 

भाविक पंढरीत दाखल होत आहेत तसे रांग लांबू लागली आहे. मंदिर समितीने भाविकांच्या दर्शन रांगसाठी १० पत्राशडची उभारणी केली आहे. यासह गोपाळपूरच्याही पुढे बॅरकेटींग करून रांगेची वेगळी व्यवस्था केली आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून रांगेवर  आच्छादन करण्यात आले आहे. चिखल होऊ नये म्हणून कचखडीही टाकली आहे. दशमापासून रांगत मोठी वाढ होत असते. त्यामळे गेल्या दोन दिवसांपासूनच भाविकांनी दर्शनाला प्रथम प्राधान्य दिले आहे. परिणामी गुरूवारी दर्शन रांग ७ नंबरच्या पत्राशडमध्ये पोहोचली. ५० हजारांहन अधिक भाविक या शेडमधील रांगत उभे आहत. प्रत्यक्ष दर्शनाला पाच तासांहन अधिकचा अवधी लागत असल्याचे दिसत आहे.  


गजबजली पंढरी !

रविवारी आषाढी एकादशी असल्याने सर्व संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या समीप पोहाचले आहेत. यासह पंढरीकडे येणारे सर्व रस्ते टाळ मृदंगांच्या गजरात हरिनामाचा जयघाष करीत निघालेल्या भाविकांच्या गर्दीने व्यापलेले दिसत आहेत. गुरूवारी सायंकाळपर्यंत शहरात अडीच तीन लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र गर्दी जाणवू लागली आहे. विशषतः महाद्वार, मंदिर परिसर, भक्तीमार्ग, चंद्रभागा बाळवंट, ६५ एकर भक्‍तांसागर तळ भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. विविध मठ, धर्मशाळांमध्येही खचाखच गर्दी होत आहे.  आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा दोन दिवसांवर आल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालल्या शेकडो पायी दिंड्या भूवंकुंठ पंढरीत दाखल होत आहेत. टाळ मटंगांच्या गजरात हरिनामाचा अखंड जयघोष करीत निघालेल्या भगव्या पताकाधारी भाविकांनी अवघी पंढरी गजबजून गेल्याचे चित्र दिसून येत आहेत. 


कोरोनाची धास्ती !

देशात आणि राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढ असल्याने आणि पंढरीत भाविकांची गर्दी होत असल्याने कोरोनाची धास्ती स्थानिकांना वाटत आहे. दोन वर्षानंतर यात्रा भरत असल्याने भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत असताना यावेळी कसलेही निर्बंध लागू केले गेले नाहीत. पंढरपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत आणि राज्याच्या विविध भागातही रुग्णांची वाढती संख्या आहे. आषाढीच्या निमित्ताने पंढरीत मोठी गर्दी होणार असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि भाविक यांच्याही मनात कोरोनाची धास्ती दिसत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा