Breaking

शुक्रवार, जुलै ०८, २०२२

टोल नाक्यावर भाविकांची अडवणूक, सक्तीने टोल वसुली !

 




सोलापूर : मुख्यमंत्र्यांनी भाविकांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला पण टोलनाक्यावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत भाविकांकडून सक्तीने टोल वसुली केली जात असल्याचा प्रकार सोलापूरसह अन्य काही ठिकाणी आल्याने भाविकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीच्या आषाढी वारीला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोळ माफी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर होताच राज्यातील भाविकांत समाधान व्यक्त करण्यात आले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी दिली जाते , याच धर्तीवर आषाढी यात्रेसाठी पंढरीला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. काही टोल नाक्यावर या आदेशाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून भाविकांच्या वाहनांना टोल न घेता पुढे सोडले जात आहे परंतु सोलापूर - मोहोळ दरम्यान असलेल्या टोल नाक्यावरील प्रकार राज्यभर चर्चेचा ठरला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीला जाणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी केल्याचे सांगूनही टोल कर्मचारी यांनी ऐकले नाही आणि टोल वसुली केली असे खेड येथील लक्ष्मण जगदाळे यांची सांगितले आहे. टोल नाका कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री यांच्या आदेशाचा हवाला दिला असतानाही त्याने भाविकानांच तसा जी आर दाखवा अशी मागणी केल्याचेही जगदाळे यांनी सांगितले. सावळेश्वर नाक्यावर टोल घेतला जात असल्याचे संदेश देखील आता भाविकांच्या मोबाईलवर फिरू लागले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात सावळेश्वर टोल नाक्यावरील प्रकार पोहोचला आहे आणि संतापदेखील व्यक्त करण्यात येऊ लागला आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाला हरताळ फासून सावळेश्वर टोल नाक्यावर भाविकांना मुजोरीचा सामना करावा लागला आहे. सावळेश्वर टोल नाक्यावर भगवा झेंडा लावून भाविकांची एक जीप आली. वाहनातील भाविकांनी टोलनाक्यावर येताच विठूमाउलीचा जयघोष केला आणि आम्ही वारकरी असून पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघालो असल्याचे त्यांनी टोल कर्मचाऱ्यास सांगितले. नाक्यावरील टोल कर्मचाऱ्याने भाविकांच्या वाहनाला रोखून धरले. मुख्यमंत्र्यांनी भाविकांना टोल माफ केला असल्याचे भाविकांना या कर्मचाऱ्यास सांगण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला पुढे जाऊ द्या अशी विनंती देखील केली.  टोल कर्मचारी मात्र हे ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. 'आधी टोल द्या आणि मगच पुढे जा' असे कर्मचारी सांगत राहिला. यातून भाविक आणि टोल कर्मचारी यांच्यात वादावादी झाली.


सावळेश्वर नाक्यावरील हा प्रकार काही एकमेव नसल्याचेही समोर येवू लागले आहे.  अकोला येथील काही वारकरी पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघाले असताना बीड प उस्मानाबाद मार्गावरील पारगाव आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर देखील वारकरी, भाविकांच्या वाहनाकडून टोल वसुली केल्याची बाब समोर आली आहे. येथील प्रकार भाविकांनी मोबाईलमध्ये चित्रित केला आहे. आषाढी वारीसाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यातून भाविक आणि वारकरी खाजगी वाहने घेवून पंढरीकडे येत आहेत. या प्रवासात त्यांना अनेक टोल नाके पार करून यावे लागते. भाविकांना टोल माफी केली असली तरी अनेक नाक्यावर असे प्रकार घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हळूहळू एकेका  टोल नाक्यावरील प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. 

माफी कागदावरच? 
फास्टटॅग द्वारे टोल वसुली होत असते त्यामुळे भाविकांचे वाहन टोल नाक्यावर येताच वाहनाच्या काचेवर लावलेल्या फास्ट टॅगवरून आपोआप टोलची रक्कम वसूल होत असते. शिवाय टोल वसुली झाल्याशिवाय वाहनांना पुढे सोडले जात नसल्याची बाब देखील समोर येऊ लागली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा कागदावरच राहणार काय ? हा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. (Forced toll collection from devotees)  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा