Breaking

शुक्रवार, जुलै ०८, २०२२

आषाढी महापूजेसाठी मुख्यमंत्री शनिवारी पंढरीत !

 


मुंबई : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारीच पंढरीत दाखल होत असल्याची माहिती मिळत असून रविवारी ते पंढरीतील विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.


आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरी गजबजू लागली असून पंढरीच्या दिशेने येणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. दिंड्या पताका आणि हरिनामाचा गजर यामुळे पंढरीसह पंढरीकडे येणारे रस्ते दुमदुमून निघाले आहेत तर भगव्या पताकांनी पंढरीचे क्षितीज देखील आता भगवे होऊ लागले आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते. यावेळच्या महापुजेला कोणते मुख्यमंत्री येणार याबाबत चर्चा सुरु होती. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखीसोहळा पंढरीकडे निघाला असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत होत्या त्यामुळे महापुजेला उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस येणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सत्तासंघर्षात ऐनवेळी वेगळीच कलाटणी मिळाली आणि शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपशी सुत जमवलेले एकनाथ शिंदे हे अकस्मातरित्या मुख्यमंत्री झाले आणि आता त्यांच्याच हस्ते आषाढीची शासकीय महापूजा होत आहे. 


रविवारी १० जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारीच पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. प्राप्त माहितीनुसार शनिवारी ९ जुलै रोजी रात्रे ११.३० वाजता मुख्यमंत्री पंढरीत पोहोचणार आहेत. 'पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी' या शासकीय विश्रामगृहावरील  कार्यक्रमाच्या समारोपासाठी मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार आहेत तर रविवारी मध्यरात्री अडीच वाजल्यापासून साडे चार वाजेपर्यंत विठ्ठल मंदिरातील आषाढीच्या शासकीय महापूजेसाठी ते उपस्थित राहणार आहेत.  (Chief Minister on Saturday for Ashadi Mahapuja) महापूजा झाल्यानंतर पहाटे साडे पाच वाजता ते इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहणार आहेत. चंद्रभागा नदीवरील घाटाच्या लोकार्पण सोहळ्यास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून हा कार्यक्रम पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे. 


रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे सुंदर माझे कार्यालय' या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर पंचायत समिती पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप सोहळ्यास त्यांची उपस्थिती असणार असून दुपारी साडे बारा वाजता पक्ष मेळाव्यास देखील त्यांची उपस्थिती असणार आहे. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोटारीने सोलापूर विमानतळाकडे निघणार असून सोलापूर येथून शासकीय विमानाने ते मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.  


शनिवारी ९ जुलै रोजी रात्री ८.४५ वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे विमानतळावर दाखल होत असून पुण्यातून ते मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण करणार आहेत. रात्री ११.३५ वा. विश्रामगृहावर ‘पर्यावरणाची वारी - पंढरीच्या दारी’ समारोप सोहळा समारंभास उपस्थिती. ११.४५ वा. शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. रविवारी रात्री २ वा, मोटारीने विठ्ठल मंदिराकडे प्रयाण. रात्री २.३० ते ४.३० - महापूजा आणि राखीव, पहाटे ५.३०. वा. इस्कॉन मंदिर भूमिपूजन सोहळा, ५.४५ वा. नदी घाटाचे लोकार्पण, सकाळी ६.१५ वा. शासकीय विश्रामगृह आईन राखीव, ११.१५ वा. बक्षीस वितरण सोहळा, ११.४५ वा. पंढरपूर पंचायत समितीमधील कार्यक्रमास उपस्थिती, १२.३० वा. पक्षमेळाव्यास उपस्थिती, दुपारी १.३० ते ३ शासकीय विश्रामगृह राखीव, ३ वा. मोटारीने सोलापूरकडे प्रयाण, ३.३० वा. विमानाने सोलापूरहून मुंबईकडे प्रयाण !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा