Breaking

शुक्रवार, जुलै ०८, २०२२

‘आषाढी’चा ढंग..., ‘बदलता’ रंग...!

 



 आषाढीचा ढंग...


बदलतारंग !






ll पंढरीची वारी आहे माझ्या घरी,ll

ll आणिक न करी तीर्थव्रत.ll

ll व्रत एकादशी करीन उपवासी,ll

ll गाईल अहर्निश मुखी नाम..ll


पंढरीची वारी! पंढरीच्या क्षितीजावर साकारताे भक्तीचा एक वेगळा रंग! आषाढी, कार्तिकी, चैत्र अन् माघी.. वर्षातल्या चार यात्रा, पण सर्वाधिक गर्दी हाेते ती आषाढीला ! कुणासाठी असते ही आषाढी यात्रा तर कुणासाठी आषाढी 'वारी'! नियमित वारी करताे ताे वारकरी! आषाढीला लाखाेंची गर्दी हाेते, त्यात वारकरी, भाविक आणि भक्त असतातच पण या गर्दीत हाैसे गवसेही घुसलेले असतात. विटेवर उभ्या  असलेल्या सावळ्या परब्रह्माच्या भेटीची आस घेऊन शेकडाे मैलावरून पायपीट करीत लाखाें भाविक आषाढीच्या चैतन्यमय साेहळ्यात सहभागी हाेत असतात. पंढरीच्या मातीत पाय ठेवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असताे आणि भक्तीचा हा साेहळा चैतन्यानं भरून आणि भारून जात असताे. 


वर्षानुवर्षे चालत आलेली वारीची ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात आणि शिस्तीत साजरी हाेत असते. लाखाे लाखाे भाविक हा एक अलाैकिक सुखाचा साेहळा अत्यानंदानं साजरा करीत असतात. समतेचा संदेश देत हे वारकरी अवघे विठ्ठलमय हाेऊन जातात. महाराष्ट्रातला शेतकरी, गाेरगरीब या वारीला येत असताे, त्याच्या लाडक्या विठुमाऊलीलाही गरीबांचा देव म्हणून ओळखलं जातं. वर्षानुवर्षे चालत आलेली पंढरीची आषाढी वारी! काळ बदलला, परिस्थिती बदलली पण भक्तीत बदल नाही झाला. आषाढी वारीचे स्वरूप मात्र बदलत गेले, बदलत्या स्वरूपाबराेबरच वारीचे रंगही बदलत राहिले. आषाढीचा ढंग अन् बदलता रंग खरंच अगदी न्यारा...!


 साधारणपणे पंधरा वीस वर्षांपूर्वीची आणि आजची वारी यात माेठी तफावत आहे, बराच बदल घडलाय पण वरवर पाहता त्याकडे काेणाचे फारसे लक्ष नाही. आषाढी वारी म्हटलं की, किमान पंधरा दिवस पंढरीत या भाविकांची गर्दी दिसायची... गर्दी तशी आजही असते पण काही वर्षात गर्दीच्या स्वरूपात माेठा फरक पडलेला आहे. आषाढीला येणारा भाविक अथवा वारकरी हा वर्षभर काबाडकष्ट करीत असताे. आषाढीला पंढरीला जाण्याची आस घेऊन ताे वारीसाठी पै पै जमा करून ठेवत असायचा. याच पैशांवर ताे 'पंढरीची वारी' अनुभवायचा. काही वर्षांपूर्वीपर्यंत आषाढीला पाच लाख भाविक आले तर यंदाची वारी माेठी भरलीअसे ऐकायला मिळायचे. आता ही संख्या बारा ते पंधरा लाखांवर जात आहे पण तरीही वारी भरली नाहीअशा प्रकारची तक्रार ऐकायला मिळते. आषाढीच्या बदलत्या रंगाचेच हे शिडकावे आहेत. 


शेतातली सगळी कामं उरकून वारीला जायचं म्हणजे दहा पंधरा दिवस पंढरीतच मुक्काम ठाेकायचा! हा जणू अलिखित नियमच हाेता पण गेल्या काही वर्षांपासून हा नियम बदलून गेल्याचे दिसत आहे. वारीच्या या बदलत्या स्वरूपाला काळानुरूप बदलणारी अनेक गणितं कारणीभूत आहेत. पंढरपूर हे केवळ तीर्थक्षेत्र म्हणून लाैकिकप्राप्त आहे, पंढरीची आर्थिक घडी राज्यातील या भाविकांवरच अवलंबून असते. व्यापार चांगला झाला तर वारी चांगली झाली असं आजही म्हटलं जातं. परिसरातील सहकारी साखर कारखानदारी साेडली तर आजही माेठे उद्याेग पंढरीत नाहीत. त्यामुळं वारी हा पंढरीचा आर्थिक कणा मानला जाताे. पूर्वी राज्यभरातून येणारे भाविक दहा पंधरा दिवस पंढरीत मुक्काम करीत असत. साहजिकच पंढरीत माेठी आर्थिक उलाढाल हाेत असे. काबाडकष्ट करणारा शेतकरी वर्षभर गाठीला बांधून ठेवलेला पैसा येथे माेकळेपणे खर्च करीत. त्यात त्याला समाधानही हाेते. वर्षभरात कधी काेठेही न जाणारा हा वर्ग पंढरीत चांगलाच रमायचा!


गेल्या काही वर्षापासून पंढरीच्या या वारीला फिरते स्वरूप प्राप्त झाले आहे. पूर्वी पाच लाखांच्या दरम्यान भाविक वारीच्या निमित्ताने यायचे पण आलेले भाविक काही दिवस पंढरीत मुक्कामी असायचे. अलिकडे ही परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली आहे. एकादशीच्या मुख्य दिवशीच भल्या सकाळपासून परतणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. पाच लाखांची संख्या चाैदा पंधरा लाखांपर्यंत गेली असली तरी हे बारा चाैदा लाख भाविक एकावेळी पंढरीत नसतात. आलेले भाविक चंद्रभागेचे स्नान आणि जमेल तसे विठुमाऊलीचे दर्शन झाले की परतीच्या प्रवासाला लागतात. हा फार माेठा बदल गेल्या काही वर्षातच झाला आहे. पूर्वीच्या काळी राज्याच्या काेनाकाेपऱ्यातून पंढरीला यायचं हे काहीसं जिकीरीचं वाटायचं !


आजच्या सारखी दळणवळणाची व्यवस्था नव्हती. अलिकडे रेल्वे, एस.टी. अशा माध्यमातून प्रवासाची चांगली साेय झाली आहे. हवे तेंव्हा येता जाता येऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून अगणित भाविक खाजगी वाहन घेऊन पंढरीला येत आहेत. पूर्वीच्या काळी अशी वाहने आजिबातच दिसत नव्हती. काही वारकरी मिळून भाडाेत्री वाहन घेऊन येतात आणि अकारण वाहनाचे भाडे वाढायला नकाे म्हणून आल्या दिवशीच परतही जातात. दहा पंधरा दिवस तर नाहीच परंतु दाेन दिवस रहायलाही आता भाविक तयार नसतात. शहरात वारीची गर्दी आज दिसते तशी पूर्वी नव्हती. शहरालगत असणाऱ्या उपनगरांतही भाविकांचे तंबू आणि फड असायचे, पण आता शहरातली गर्दी काही प्रमाणात कमी झालीच आहे. उपनगरात तर आता या वारीचे आस्तीत्वही जाणवत नाही. पूर्वेला ६५ एकर परिसरात ही वारी रमली असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.


वाढत्या महागाईचाही माेठा फटका वारीला बसलेला असल्याचे दिसते. आधीच गाेरगरीब असलेला भाविक आणि भरमसाठ महागाई त्याला पंढरीत जास्त दिवस मुक्काम करूच देत नाही. त्यात पंढरीच्या मानसिकतेतही माेठा फरक पडलेला आहे. आषाढी वारी जवळ यायला लागली की आवश्यक वस्तूंचे भाव भडकतात, वारी आणि वारकरी हे केवळ आपल्या कमाईचे माध्यम आहे असे अनेकांना वाटू लागले आहे. त्यातच वारकऱ्याची वेगवेगळ्या प्रकारानं लूट करणाऱ्याची संख्याही सातत्यानं वाढत चालली आहे. स्थानिकांसाेबत बाहेरून येणारे व्यापारी, विक्रेते वारीच्या काळात माेठा व्यापार हाेईल या आशेवर असतात. काही दिवसांपुरते वाढलेले दर भाविकांच्या खिशाला कात्री लावतात आणि मग भाविकांना अधिक दिवस पंढरीत राहणं आता परवडेनासे झाले आहे. खाजगी गाड्याचे वाढते प्रमाण वारीला फिरत्या यात्रेचे स्वरूप देऊन गेले आहे. साहजिकच वारीला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे परंतु व्यापारी वर्ग मात्र दरवर्षी नाराजी व्यक्त करीत राहताे.


गाेपाळकाला घेतल्याशिवाय पंढरीचा निराेप घेतला जात नव्हता, पण आता केवळ काही माेजकेच वारकरी गाेपाळकाल्यापर्यंत पंढरीत थांबतात... एकादशीच्या दिवसांपासूनच आषाढीला ओहाेटी लागू लागते आणि अवघ्या दाेन दिवसांतच आषाढीची सांगता झाल्याचे चित्र पहायला मिळते. मुबलक वाहतूक व्यवस्था, वाढती महागाई तसेच भाविकांकडे बकराम्हणून पाहण्याची वाढलेली मानसिकता यातून वारीचे स्वरूप बदलत चालले आहे. पंढरीतील अनेक स्वयंसेवी संस्था, नागरिक माेठ्या भक्तीने भाविकांची सेवा आजही करताना दिसतात पण यातही काही अपप्रवृत्ती घुसल्याचे पहायला मिळते. 


स्थानिकांकडून भाविकांना माेफत भाेजन, चहा, नाष्टा तसेच फराळाचे वाटप केले जाते. ही सुध्दा वर्षानुवर्षे चालत आलेली परंपराच बनून गेली आहे. बाेटावर माेजणारे काही लाेक मात्र ही सेवाही कॅशकरण्याच्या भानगडी करताना दिसतात. दिखाऊपणा करीत या 'सेवेचे' छायाचित्र वर्तमानपत्रातून येण्याची धडपड करीत हा अट्टाहास करणारे महाभागही अलिकडे दिसू लागले आहेत. एकादशीला शंभर केळी वाटून वर्तमानपत्रासाठी मात्र ती पाच हजारावर जातात. भाविकांना वाटप करण्यापेक्षा वाटतानाचे फोटाे काढून घेण्यावरच अधिक भर दिसून येताे. साहजिकच यातून त्यांची भावना दिसून येते. भाविकांची सेवा तर पूर्वांपार केली जात आहे पण पूर्वी असे प्रकार आजिबातच नव्हते.


एकदम लाखाे भाविक पंढरीत येत असल्यामुळं त्यांच्या निवासाचा माेठा प्रश्न निर्माण हाेताे. आलेले भाविक माेकळ्या जागेत तंबू, राहुट्या टाकून किंवा ट्रकच्या आश्रयाला राहतात. तेथेच सर्वांचा स्वयंपाक करतात आणि सहभाेजन करतात. आठ दहा दिवस असे दिसणारे तंबूही आता कमी झाले आहेत. पंढरीतील मठ आणि लाॅज ताेकडे पडतात. बहुसंख्य भाविक स्थानिकांच्या घरात राहतात. मठांची आणि लाॅजेसची संख्या आता वाढली पण पूर्वीपासूनच नागरिकांच्या घरात राहण्याच पध्दत आहे. काही दिवस राहून भाविक परत जाताना घरमालकाच्या हातात काही रक्कम द्यायचे. काेणी किती पैसे द्यावेत हे ठरलेले नसायचे. जाे ताे आपल्या परिस्थितीवर ही रक्कम द्यायचा तर काेणी न देताही निराेप घ्यायचा. हे सगळं अगदी ठरून गेलेलं असायचं! गेल्या काही वर्षांपासून मात्र हा एक स्वतंत्र धंदा बनला गेला. भाविकांची निवास व्यवस्था आणि त्यातून कमाई हाच एक व्यवसाय बनत गेला. सेवेची जागा व्यवसायानं घेतली आणि आपुलकीचा ओलावा संपून गेला. आता अनेकजण रक्कम ठरल्याशिवाय भाविकांना पिशवीही खाली ठेऊ देत नाहीत. कमाई करण्याची मानसिकता वाढल्यानं पूर्वीचा जिव्हाळाही कमी हाेत गेला आणि पंढरीत अधिक दिवस न थांबणेच हिताचे असल्याची भावना भाविकांत हाेऊ लागली.


आषाढी यात्रेला फिरते स्वरूप प्राप्त झाले असले तरी वारीतील भाविकांत मात्र एक लक्षणीय बदल दिसून येऊ लागला आहे. विजार अथवा धाेतर, फेटा अथवा टाेपी अशा कपड्यात पूर्वी दिसणारा सामान्य भाविक! आता मात्र भाविकांच्या या गर्दीत जिन्स घातलेले तरूण भाविक  अधिक प्रमाणात दिसू लागले आहेत. भाविक असाे वा वारकरी! त्याची एक टिपीकल छबी दिसायची. धाेतर, दाेन बटणांचा अथवा नेहरू शर्ट, डाेक्यावर मुंडासं आणि गळ्यात तुळशीची माळ, हातात भगवा झेंडा अशी त्याची पारंपारीक ओळख! ओळखीची ही खूण अजूनही कायम आहे पण त्यात बदलता रंगही आता पहायला मिळू लागला आहे. तरूणाईलाही या वारीनं भुरळ घातली असल्याचे गेल्या काही वर्षांपासून पहायला मिळत आहे. पंढरीच्या वारीच्या गर्दीत आता तरूणवर्गही माेठ्या प्रमाणात दिसताेय. अंगावर जीन्सचे कपडे असले तरी त्याच्या हातात आता भगवी पताका आणि ओठावर संतांचे अभंग येत आहेत. बदलत्या युगात हा बदल तसा निश्चितच दिलासादायक आहे.


 सामान्यातल्या सामान्य भाविकांच्याही हातात आता माेबाईल दिसू लागला आहे. सुशिक्षीत वर्ग माेठ्या प्रमाणात वारीत वावरताना दिसताे. नाेकरी करणारेही अनेकजण आता काही दिवस रजा काढून वारीला येतात तर कुणी पालखी साेहळ्यासाेबत काही दिवस रमताे. विठ्ठल हा तसा गरीबांचा देव, त्याचे भक्तही गरीबच! पण अलिकडे ही संकल्पनाही बदलून गेली आहे. मुंबईचा डाॅनअशी ओळख असलेल्या अरूण गवळीलाही वारीचा माेह हाेताे तसा अनेक उद्याेगपतीही आता पंढरीत दाखल हाेतात. माेठी रक्कम किंवा साेने विठ्ठलाला गुप्तदानाच्या स्वरूपात देतात तर कुणी उघडपणे देऊनही आपलं नाव गुप्त ठेवण्याचा आग्रह धरतात. कधीकाळी खेड्यातल्या कष्टकऱ्याचीच वारी वाटत हाेती पण आता परदेशी पाहुण्यांनाही या वारीने भुरळ पाडली आहे. पालखी साेहळ्याचा अनुभव घेत काही परदेशी पंढरीला येतात तर काही थेट पंढरीत येऊन स्वर्गीय सुखाचा हा साेहळा अनुभवतात. 


बहुसंख्य भाविक हा शेतकरी अथवा शेतात काम करणारा असल्यामुळं वारीचं निसर्गाशी जवळचं नातं आहे. पर्जन्यमान कमी असलं की त्याचा माेठा परिणाम वारीवर हाेऊ लागला आहे. पाऊस नाही बरसला की शेतकरी भाविकांच्या चेहऱ्यावरही दुष्काळाची चिंता दिसू लागते. पूर्वीच्या काळी पंढरीत आलेला भाविक आपलं गाव, शिवार सगळं विसरून जायचा पण आता तसे घडत नाही. निसर्गही आता हुलकावण्या देत राहिल्याने दरवर्षी आषाढीला पावसाच्या भल्याबुऱ्याची चर्चा हाेत असते. व्यापारीही व्यापाराचा अंदाज पर्जन्यमानावर करू लागला आहे. भक्ती तीच असली, भाविक ताेच असला तरी यात्रेच्या स्वरूपात सतत बदल हाेताना दिसत आहे. गेल्या पंधरा वीस वर्षात आषाढीचे रंग सातत्याने बदलत गेले आहेत, आषाढीचे हे बदलते रंग खाेलवर परिणाम करणारेही ठरत आहेत. पंढरीच्या आर्थिक घडीवर या बदलत्या रंगांचा माेठा दुष्परिणामही जाणवत आहे. रंग बदलले, ढंग बदलले पण वारी मात्र तशीच आहे...तशीच राहील.. ढंग अन् रंग मात्र असाच बदलत राहिल...!!


                                                                                              - अशाेक गाेडगे 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा