Breaking

शनिवार, जुलै ०२, २०२२

आषाढी महापूजा होताच नवे सरकार कोसळणार !



पंढरीच्या विठूमाउलीची आषाढीची शासकीय महापूजा होताच राज्यातील नवे सरकार कोसळणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.


महाविकास आघाडीचे सरकार लवकरच पडणार असे भाकीत भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते सतत करीत राहिले पण अडीच वर्षे काही केल्या सरकार कोसळले नाही. तीन राजकीय पक्षाचे सरकार असल्यामुळे ते टिकणार नाही असे भाजप नेते सतत सांगत राहिले पण तीनही पक्षांनी एकोपा दाखवत सरकार टिकवले आणि चांगल्या पद्धतीने चालवून देखील दाखवले. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कारकीर्द तर उजळून निघाली. अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत आहे. आपसातील वादातून सरकार पडेल असे सांगितले गेले पण तसे घडत नसल्याने महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचण्याचा प्रयत्न सर्व मार्गाने करण्यात आला. काही केल्या तीन पक्षात वाद होत नाहीत हे दिसून आल्यावर शिवसेनाच फोडण्यात आली आणि महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. ज्या पद्धतीने नवे सरकार अस्तित्वात आले ते महाराष्ट्रातील सामान्य माणसाना रुचले नाही. सोशल मीडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रियातून हे उघड होत आहे. 


विठ्ठलाची शासकीय महापूजा करून गेल्यानंतर लगेचच सरकार कोसळण्याच्या घटनेचा देखील एक इतिहास आहे. पंढरीच्या आषाढी एकादशीची महापूजा करून परत गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागल्याचे सलग तीन घटना आधी घडल्या आहेत. त्यावेळी याची चर्चाही खूप झाली होती. तसाच प्रसंग यावेळी येऊ घातला असल्याचे दिसत आहे.  


नव्या सरकारचा शपथविधी झाला आणि पहिल्या दिवसापासून या नव्या सरकारबद्धल शंका व्यक्त होऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीवरच नाराज आहेत हे काही लपून राहिले नाही. नवे सरकार आणण्यासाठी फडणवीस यांनी प्रचंड धावाधाव केली पण ऐनवेळी त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची तर मिळालीच नाही पण कनिष्ठ असलेल्या नेत्याच्या हाताखाली उप मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची वेळ आली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असून आपण सत्तेत सहभागी होणार नाही असे फडणवीस यांनी सांगितले पण पक्षाच्या आदेशाने त्यांना इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. फडणवीस काही बोलले नसले तरी शपथ घेतानाचा त्यांचा पडलेला चेहरा सगळे काही बोलून गेला. नंतर फडणवीस यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लागले पण या फ्लेक्सवरून भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांचाच फोटो गायब झालेला पाहायला मिळाला. या घटनेतून फडणवीस किती नाराज आणि अस्वस्थ आहेत याच सहज कल्पना येते. 


भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ अधिक असतानाही भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री केले नाही आणि बंडखोरी करून आलेले एकनाथ शिंदे यांना हे पद मिळाले. राज्याच्या राजकारणात ही मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. फडणवीस यांची तर पदावनती केलीच पण शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागे भाजपचे मोठे गणित असण्याची शंका राजकीय जाणकार व्यक्त करू लागले आहेत.  लोकशाहीचे कसे धिंडवडे काढले जात आहेत हे सामान्य माणसापासून कायद्याचे अभ्यासक देखील उघडपणे सांगू लागले आहेत. एकनाथ शिंदे गट आपण शिवसेनेत आहोत असे म्हणत असला तरी त्याला कायद्याचा आधार नाही. कायदेतज्ञांच्या मते शिंदे गटाला कुठल्यातरी राजकीय पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही. अद्याप शिंदे गट हा कुठल्याच राजकीय पक्षात विलीन झाला नाही त्यामुळे कायदेशिर पेच निर्माण झालेला कायम आहे. सर्वोच्च न्यायालयात अनेक विषय प्रलंबित असून त्याची सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. यावेळी सरकार पडेल की वाचेल हे पाहायला मिळणार आहे. 


एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागे भारतीय जनता पक्षाची मोठी खेळी आणि राजकारण असल्याचे राजकीय अभ्यासक सांगू लागले आहेत. पहाटेच्या शपथविधीने भाजपची मोठी कोंडी झालेली आहे. राष्टवादी फोडून सत्ता मिळविण्याचा केलेला प्रयत्न फसल्याने भाजप ताक फुंकून पिताना दिसत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. भाजपचा डाव, फडणवीस यांची नाराजी आणि कायद्याचा बडगा यामुळे हे सरकार कोसळू शकते असा तर्कवितर्क सुरु असतानाच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकार कोसळण्याचे भाकीत केले आहे.  (The new government will collapse after Ashadi Mahapuja) पंढरीच्या आषाढी वारीतील शासकीय महापूजा करून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून पायउतार व्हावे लागू शकते हे मिटकरी यांनी अधोरेखित केले आहे. 


शासकीय महापूजा केल्यानंतर पूजा करणाऱ्यांचे सरकार दुसऱ्या दिवशी राहील की नाही हा प्रश्न आहे असे आ. अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदार अपात्र ठरल्यास सर्वकाही समोर येणार असून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पांडुरंग का नाराज आहे हा मात्र संशोधनाचा विषय आहे. नवे सरकार भाजपचे आहे की शिवसेनेचे याचे उत्तर चंद्रकांत पाटील यांनीच द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचा मुख्यमंत्री आषाढीची शासकीय महापूजा करणार नाही हे आपण आधीच सांगितले होते. आपले भाकीत आज खरे ठरताना दिसत आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. 


घोडा मैदान जवळच !

गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचे सरकार पडण्याचे मुहूर्त भाजप काढत होते आता राष्ट्रवादीने मुहूर्त दिला आहे.  आषाढी महापूजा आणि सर्वोच्च न्यायालातील सुनावणी लवकरच होणार असल्याने 'घोडा मैदान जवळच आहे'. ११ जुलै रोजी न्यायालयात काय घडतेय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा