Breaking

रविवार, जुलै ०३, २०२२

अवैध वाळूची वाहने सोडल्याने पोलीस हवालदार निलंबित !

 



मंगळवेढा : अवैध वाळू प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या एका पोलीस हवालदारास निलंबित करण्यात आले असून या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 
वाळू चोरांनी सगळीकडेच धुमाकूळ घातला असून प्रशासनाच्या कितीही कारवाया झाल्या तरी वाळू चोरी थांबताना दिसत नाही. वाळू चोरांशी आर्थिक संगनमत करणाऱ्या प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात देखील अडकले आहेत. वाळू चोरांशी प्रशासनातील काही झारीतील शुक्राचार्य संगनमत करीत असल्याची चर्चा नेहमीच होते. वाळूचोरीला कुणाचा आशीर्वाद असतो याबाबत जनमानसात सतत चर्चा सुरु असते. प्रशासनाकडून वाळू चोरीवर सतत कारवाई होत असते. वाळू उपसा करणाऱ्या बोटी फोडल्या जातात, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते परंतु वाळूचा उपसा आणि चोरी कमी होताना दिसत नाही. याबाबत उलट सुलट चर्चा कायम होत असताना वाळू प्रकरणी एका पोलीस हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 


बेकायदा वाळूची वाहतूक करणाऱ्या टिपर आणि टमटम या वाहनावर कारवाई न करता आर्थिक तडजोड करून सोडून दिल्याच्या तक्रारीवरून पोलीस हवालदार अर्जुन मुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सांगोला तालुक्यातील माण नदीच्या पात्रातून अवैध वाळू घेऊन निघालेली दोन वाहने मध्यरात्रीनंतर पकडण्यात आली होती. लक्ष्मी दहिवडी ते सावे दरम्यान 'गौरी जलधारा' समोर पोलिसांनी ही वाहने पकडली होती. या वाहनावर कारवाई होणे अपेक्षित होते परंतु तसे न करता हवालदार अर्जुन मुळे यांनी आर्थिक तडजोड करून ही वाहने विना कारवाई सोडून दिल्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती. याबाबत चौकशी करून मुळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Illegal sand transport, police suspended) हवालदार मुळे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

 
पोलिसांना हादरा !

एक पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई केल्याचा आदेश मंगळवेढा पोलीस ठाण्यात येताच एकच खळबळ उडाली आणि अन्य पोलीस देखील हादरले आहेत. पोलिसावर करण्यात आलेल्या कारवाईचा धसका अनेकांनी घेतला असून या कारवाईची चर्चा देखील होताना दिसत आहे.  


अधिक बातम्यासाठी * येथे क्लिक * करा ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा