Breaking

मंगळवार, जुलै १२, २०२२

आषाढी संपताच कोरोना वाढण्याची शासनाला भीती !



पंढरपूर : पंढरीची आषाढी वारी संपताच कोरोना वाढण्याची भीती आधीपासूनच व्यक्त केली जात असताना आता शासनाला देखील अशी भीती वाटू लागली असून त्यासाठी सर्व जिल्ह्यांना आवश्यक काळजी घेण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. 


कोरोनाची चोथी लाट आली आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही परंतु राज्यात सगळीकडे कोरोनाचा फैलाव होत असल्याचे वाढणाऱ्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात तर कोरोना रुग्णांची वाढ वेगवान आहे. महाराष्ट्रात शहरांसोबत ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत पंढरीची आषाढी वारी साजरी होत असून या वारीसाठी महाराष्ट्राच्या कोना कोपऱ्यातून भाविक पंढरीत आले. आषाढीचा सोहळा साजरा करून भाविक परतीच्या प्रवासालाही लागले. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण पंढरपूर तालुक्यात असल्याचे या आधीच समोर आले आहे शिवाय पुणे, मुंबई, ठाणे अशा विभागात कोरोनाच्र रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. राज्याच्या सर्वच विभागातून भाविक आषाढीसाठी पंढरीत दाखल झालेले असल्याने कोरोनाची भीती कायम आहेच. 



पुणे जिल्ह्यातून संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरीकडे येत असतो. राज्यात सर्वाधिक सक्रीय कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. आठवड्याभारत पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णात २८ टक्के वाढ झाली आहे त्यामुळे राज्य शासनाने पुणे जिल्ह्यात विशेष काळजी घेण्याबाबत आदेश दिले आहेत. मराठवाड्यातील जिल्हे विशेषत: जालना जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना हा मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे.  आवश्यक त्या सर्व सूचना शासनाने प्रशासनाला दिल्या आहेत. राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरीला आले आणि लाखो भाविक एकाच वेळी एकत्र आल्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असणे स्वाभाविक आहे. लाखो भाविकांची गर्दी पंढरीत झाली त्यामुळे कोरोना रुग्णांत किती वाढ होतेय ते येत्या काही दिवसांत आकडेवारीतून स्पष्ट होणार आहे.  


मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पंढरीची कोणतीही वारी भरली नव्हती, यावर्षी कोरोनां वाढत असतानाही आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात आली त्यामुळे भाविक मोठ्या संख्येने आणि तितक्याच उत्साहाने पंढरीत दाखल झाले. आषाढी यात्रेच्या वेळी कोरोनाचे कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नव्हते आणि भाविक स्वयंस्फूर्तपणे मास्कचा वापर करताना देखील दिसले नाहीत. लाखोंच्या संख्येने भाविक राज्याच्या विविध विभागातून दाखल झालेच पण पालखी सोहळ्यातील भाविक पुणे, सातारा जिल्हे पार करीत सोलापूर जिल्ह्यात पोहोचले आहेत. वारीला आलेले भाविक पुन्हा आपापल्या गावी पोहोचणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसण्याची शक्यता आहे. 


राज्य शासन कोरोनाच्या बाबतीत आषाढी यात्रेनंतर आता अधिक सतर्क झाले असून सर्व उपाय योजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तीव्र ताप, गंभीर श्वसन विकार असले तर तातडीने उपाययोजना करणे, चाचण्या करणे आणि स्थानिक गरज पाहून ही संख्या वाढविणे, कोरोना व्हायरसमध्ये होणारा बदल लक्षात येण्यासाठी आरोग्य विभागाला नमुने पाठविणे तसेच विशिष्ठ भागात रुग्णांची वाढ होत असल्यास राज्याच्या आरोग्य विभागाला याची माहिती देणे याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यांना राज्य शासनाने सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.  


कोरोनाचा वाढता आलेख.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ज्या पुणे जिल्ह्यातून पालखी सोहळे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले त्या पुणे जिल्ह्यात रोजचे रुग्ण वाढत असल्याने आकडेवारीवरून दिसून येत आहे. (The government fears that Corona will grow as soon as Ashadi ends )


             दिनांक         रुग्ण (पुणे जिल्हा)  
                                                   ------------------------------

  •         ५ जुलै         ५३३५ 
  •         ६ जुलै         ५७५० 
  •         ७ जुलै         ६०७९ 
  •         ८ जुलै         ६१९७ 
  •         ९ जुलै         ६३७१ 
  •         १० जुलै       ६४७०

                                                   ---------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा