Breaking

सोमवार, जुलै ११, २०२२

वारकऱ्यांच्या टेंपोला भीषण अपघात !


 

सांगली : पंढरीची आषाढी वारी करून परत निघालेल्या वारकऱ्यांच्या टेंपोला अपघात होऊन १७ वारकरी जबर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 


अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढलेले असून रोजच अपघात घडत आहेत. पंढरीच्या यात्रेच्या दरम्यान देखील हमखास अपघात घडताना दिसत आहेत. मागील यात्रेवेळी पंढरपूरच्या परिसरात भाविकांच्या काही वाहनांना अपघात झाले होते तसेच भाविक परत जात असताना देखील काही अपघात घडले होते. यावर्षीही ही मालिका सुरूच राहिली आणि ऐन एकादशीच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे भाविकांचा अपघात झाला आणि या अपघातात दोन भाविक ठार झाले. आज पुन्हा भाविकांच्याच वाहनाला मोठा अपघात झाला आणि या अपघातात सतरा भाविक जखमी होण्याची घटना घडली आहे.


मोठ्या उत्साहात आणि भक्तीच्या वातावरणात आषाढीचा सोहळा उरकून आज सांगली जिल्ह्यातील भाविक आपल्या गावी परत जात होते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील भागाईवाडी तसेच परिसरातील ६० भाविक एक टेंपो घेऊन पंढरीच्या वारीला आलेले होते. आज ते परत जात असताना तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथे या टेंपोला अपघात झाला आणि टेंपो उलटून भाविक जखमी झाले.  मनेराजुरी येथील पवार वस्तीजवळ भाविकांचा टेंपो पोहोचला असताना वळणावरून जाताना चालकाचा ताबा सुटला आणि सदर टेंपो रस्त्याच्या कडेला पालथा झाला. यावेळी काही भाविक वाहनातून बाहेर फेकले गेले तर काही भाविक अन्य भाविकांच्या अंगावर पडले. यातच हे भाविक जखमी झाले असून त्यांना तातडीने सांगली आणि मिरज येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  काही भाविकांना तासगाव येथील रुग्णालयात दाखल केले गेले आहे. 


अपघातात जखमी झालेल्या भाविकांत महिला आणि वयस्कर भाविकांचा समावेश आहे. अपघात होताच काही नागरिक मदतीला धावले आणि जखमींना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. पंढरपूरकडे जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत जीप घुसल्याने नुकताच एका अपघात झाला होता. यावेळी देखील सतरा वारकरी गंभीर स्वरुपात जखमी झालेले होते. आता पुन्हा पंढरपूरहून आपल्या गावीं परत निघालेल्या भाविकांच्या गाडीला हा अपघात झाला आहे. (Accident to the tempo of Warakaris returning from Ashadi wari Pandharapur) सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही. सर्व जखमी वारकरी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.


  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा