Breaking

सोमवार, जुलै ११, २०२२

सव्वा दोन लाखांची विदेशी दारू जप्त !



पंढरपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सव्वा दोन लाखांची अवैध दारू जप्त केली असून ड्राय डे साठी ही देशी आणि विदेशी दारू आणली गेली होती. 


आषाढी यात्रेच्या कालावधीत तीन दिवस मद्य विक्री बंद ठेवण्यात येते त्यामुळे चोरटी दारू विकून पैसे कमावण्याचे प्रकार प्रत्येक वेळी आढळून येतात. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर आणि परिसरातील शासनमान्य दारू दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश असतात. ही दुकाने बंद असली की तळीराम अस्वस्थ होतात आणि दारू कुठे मिळतेय याचा शोध घेत असतात. अशा तळीरामाच्या शोधात चोरट्या मार्गाने दारू विकणारे असतात. जादा दराने चोरून अशा अवैध दारूची विक्री केली जाते आणि यातून भरपूर पैसा कमावला जातो. ड्राय डे च्या दिवशी अशा चोरट्या मार्गाच्या दारूंच्या शोधात अनेकजण असतात. त्यामुळे ड्राय डे च्या अगोदरच चोरट्या दारूचा साठा केला जातो आणि ड्राय डे दिवशी विक्री केली जाते. आषाढी यात्रेत सलग तीन दिवस शासनमान्य मद्य विक्री बंद असल्यामुळे हा काळा धंदा तेजीत असतो. 


चोरट्या आणि अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क बारीक नजर ठेवून असते आणि अशा प्रकाराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा मोहिमेतच कुर्डूवाडी आणि पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे २ लाख ३३ हजार ३७० रुपयांची देशी आणि विदेशी अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला अशा दारूबाबत माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी कुर्डूवाडी टिळक चौकात असलेल्या एका खोलीवर छापा टाकला तेंव्हा अवैधरित्या देशी, विदेशी दारूचा साठा केला असल्याचे निदर्शनास आले. खाटिक गल्ली येथील अयाज रशीद शेख याच्याकडे हा साठा आढळून आला आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा साठा ताब्यात घेतला. येथे १८० मिलीच्या १ हजार ७९ बाटल्या तर ६५० ,मिली क्षमतेच्या १६८ बियरच्या बाटल्या असा १ लाख ८९ हजार ६९० रुपये किमतीचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.. अयाज शेख याच्या विरोधात महारष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पंढरपूर तालुक्यात देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अशाच प्रकारची कारवाई केली आहे. पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे पांडुरंग चौकात असलेल्या मारुतीच्या मंदिरामागील एका बोळात पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारूचा साठा करण्यात आला होता. या ठिकाणी छापा टाकला असला देशी दारू संत्राच्या १८० मिली क्षमतेच्या ६४२ बाटल्या आढळून आल्या. ४३ हजार ६८० रुपयांचा दारू सांठा जप्त करून सचिन धोंडीराम जाधव याच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. कुर्डूवाडी आणि पंढरपूर तालुक्यातील अवैध दारू ही ड्राय डे च्या दिवशी विक्रीसाठी आणण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा