Breaking

सोमवार, जुलै ११, २०२२

बंडखोरांनी आजारपणाचा फायदा उठवला !



मुंबई : आपली राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला गेला परंतु चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतेहेच या लोकांनी दाखवून दिले आहे असा घणाघात शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 


एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी करून भाजपशी संधान बांधून सत्ता स्थापन केली आहे त्यामुळे शिवसेनेत आणि राज्याच्या राजकारणात देखील प्रचंड वादळ उठले आहे. हे वादळ सर्वोच्च न्यायालयापर्यंत देखील पोहोचले आहे. ज्यांनी मोठे केले त्यांनाच दगा देण्यात आल्याच्या भावना महाराष्ट्रात निर्माण झाल्या असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली आहे. समाजमाध्यमांवर या सत्तानाट्याचे प्रचंड पडसाद उमटत असून सोशल मीडिया हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. दरम्यान शिवसेनेने गद्दार मंडळीना पक्षाच्या बाहेर हाकलून देण्याचा सपाटा लावलेला आहे. पक्षाशी बेईमानी करणाऱ्या अनेक पदाधिकारी आणि नेत्यांना पक्षातून बाहेर काढले जात आहे. नव्याने पक्षाची बांधणी करण्याचे काम नेटाने सुरु आहे. 


पक्षांतर्गत बैठका, मेळावे घेवून शिवसेना पक्षाची पुन्हा बांधणी करीत आहे तसेच अजूनही शिवसेनेची दारे उघडी असून ज्यांना परत यायचे असेल त्यांचे स्वागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यातच युवासेना प्रमुख आदिग्या ठाकरे यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवत बंडखोरांना आव्हान दिले आहे. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते असे चित्र बंडखोरांनी निर्माण केले आहे पण चांगल्या माणसाना देखील राजकारणात स्थान असते हे मला दाखवून द्यायचे आहे असे सांगत आदित्य ठाकरे यांनी आपला इरादाच स्पष्ट केला आहे. 


फुटीर आणि गद्दार यांच्याबाबत आपणास काही बोलायचे नाही पण आमच्यावर बोलत असताना, खोटे आरोप केले जात असताना काहीतरी लाज बाळगा, ज्यांना शिवसेना सोडायची होती किंवा सोडायची आहे त्यांनी आधी राजीनामे द्यावे आणि मग खुशाल निवडणुकीला सामोरे जावे असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी दिलेले आहे.  बंडखोरी करून मुख्यमंत्रीपद मिळवलेले एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आहे, सत्ता असताना पळून जाण्याचा प्रकार प्रथमच राजकारणात घडला असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

  

पंधरा वर्षांपूवी झालेले बंद आपण पहिले असून त्यावेळी बंड करणारे आता कुठे आहेत हे सर्वाना माहित आहे, ज्यांनी बंड केले ते पुढे टिकले नाहीत हा शिवसेनेचा इतिहास आहे. बंड करण्यामागची कारणे बंडखोरांकडून दिली जातात पण ती निरर्थक आणि चुकीची आहेत. केवळ सत्तेच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी हे कथित बंड करण्यात आले असून  एकीकडे महाराष्ट्याच्या डोळ्यात पाणी होते तेंव्हा हे बंडखोर डान्स करीत होते. पंचतारांकित हॉटेलमध्ये मजा करीत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया केली जात होती तेंव्हा दुसरीकडे आमदारांची जमवाजमाव करण्यात येत होती आणि पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सुरु होते. राक्षसी महत्वाकांक्षेपोटीच गद्दारी करण्यात आली आहे असा घणाघात देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.  (Aditya Thackeray's criticism of Eknath Shinde)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा