Breaking

रविवार, जुलै १०, २०२२

सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून तानाजी सावंत यांची हकालपट्टी !

 


मुंबई : शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केली आणि राज्यात नवे सरकार स्थापन करण्यात आले. शिवसेनेला हा मोठा धक्का बसला असला तरी शिवसेनेतून गेलेले संपतात, शिवसेना संपत नाही असा यापूर्वीचा इतिहास आणि अनुभव आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा शिवसेनेची बांधणी सुरु केली असून बैठका आणि निर्णय याचा सपाटाच लावलेला आहे. बैठका, मेळावे घेत शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचा नेटाने प्रयत्न सुरु झाले आहेत तर बंडखोर आणि गद्दार मंडळींवर पक्षांतर्गत कारवाई करण्याचाही धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून तानाजी सावंत यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. 


तानाजी सावंत यांना शिवसेनेने मंत्री देखील केले होते परंतु ठाकरे सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळाले नव्हते याची खदखद अनेकदा दिसून आली होती. एकनाथ शिंदे यांनी बंड करताच त्यांच्या गटात तानाजी सावंत सामील झाले होते. शिवसेनेच्या विरुद्ध झालेल्या बंडात तानाजी सावंत हे देखील सहभागी झाले आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होतेच. त्यानुसार सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून सावंत यांची हकालपट्टी (Tanaji Sawant expelled from Shivsena) करून त्यांच्या जागी मुंबईचे अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सावंत यांनी बंडखोरी केल्यानंतर सावंत यांच्या पुणे आणि सोलापूर येथील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. 


राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारचे भवितव्य उद्या ठरणार असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. शिवसेना आणि शिंदे गट यांच्याकडून देण्यात आलेले व्हीप, गटप्रमुख, प्रतोद यांच्या केलेल्या निवडणुका तसेच करण्यात आलेली बहुमत चाचणी वैध की अवैध आदी विषयांबाबत उद्या सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या निकालावर शिवसेना आणि नवे सरकार यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.  व्हीप उल्लंघनाबाबत विधिमंडळ सचिवालयाने देखील दोन्ही शिवसेना आणि शिंदे गट यांना नोटीसा पाठविल्या असून उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. प्रकरण न्यायालयात असताना बहुमत चाचणी करून राज्य सरकार अस्तित्वात आले आहे परंतु ही बहुमत चाचणीच बेकायदेशीर असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे त्यामुळे उद्या सर्वोच्च न्यायालयात काय घडतेय याची देशभरात उत्सुकता तर आहेच पण या न्यायालयाच्या निर्णयावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. 


दरम्यान शिवसेनेने गद्दार मंडळीवर कारवाईचा बडगा उगारलेला असून अनेकांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. कारवाई करण्याचे हे सत्र सुरूच असून आणखी काही दिवस ते सुरु राहणार आहे. शिवसेना सोडून गेलेल्यावर हकालपट्टीची कारवाई करीत नव्या नियुक्त्या होणार आहेत. अजूनही काही जण शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी होत आहेत तर अनेक नेते, पदाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयात काय घडतेय याकडे राज्यासह देशाच्या नजरा लागलेल्या आहेत.  


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा