Breaking

रविवार, जुलै १०, २०२२

आषाढी एकादशीची शासकीय महापूजा संपन्न !

 


पंढरपूर : आषाढी महापूजेचा सोहळा चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली तर बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नवले दाम्पत्यांना मुख्यमंत्र्यांसमवेत पूजेचा मान मिळाला. 


आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीत बारा लाख भाविक दाखल झाले असून हरीनामानाच्या गजरात आषाढीचा आनंदी सोहळा साजरा करण्यात येत आहे. पडत्या पावसात भाविक चिंब झाले असून भक्तीरसाने देखील न्हाऊन निघाले आहेत. संततधार पावसातच काल संताचा पालखी सोहळा पंढरीत दाखल झाला आणि भक्तीच्या सोहळ्यात पंढरी रममाण झाली. हरिनामाचा गजर, विठूमाऊलीचा जयघोष, टाळ मृदंगाचा निनाद आणि भगव्या पताका यामुळे अवघी पंढरी चैतन्यमय झाली आहे. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली असून दर्शन रांग ही सतत लांबाताना दिसत आहे. मुखदर्शन घेण्यासाठी सात तास तर पदस्पर्श दर्शनासाठी चौदा तास लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. दर्शनासाठी लागलेली रांग ही पत्राशेडपर्यंत असून तेथून पुढेही सुमारे पाच किमी पर्यत रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे.  


आषाढीमुळे अवघी पंढरी दुमदुमून गेली असून या प्रसन्न आणि चैतन्यमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या धर्मपत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठुमाऊलीची आषाढीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, त्यांची पत्नी वृषाली शिंदे, मुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे यांच्यासह मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह भ प गहिनीनाथ औसेकर महाराज आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले यांना मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजा करण्याचा मान मिळाला. "राज्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, बळीराजा सुखाऊ दे' असे साकडे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरीच्या पांडुरंगाला घातले असल्याचे त्यांनी सांगितले. 


गेल्या दोन वर्षांपासून आषाढी यात्रा झाली नव्हती त्यामुळे यावर्षी विक्रमी गर्दी होईल असे सांगितले जात होते परंतु अपेक्षेप्रमाणे पंधरा लाखाहून अधिक भाविक पंढरीत आले नसल्याचेच दिसत आहे. प्रशासनाने मात्र विक्रमी गर्दी अपेक्षित धरून यंत्रणा सज्ज ठेवली होती. मंदिर समितीने देखील भाविकांना सर्व त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दशमीच्या दिवशी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु राहिल्याने पडत्या पावसात पालखी सोहळे पंढरीत दाखल झाले आणि संततधार पावसामुळे भाविकांचे हाल देखील झाले. ६५ एकर परिसरात तर भाविकांची तारांबळ उडालेली दिसत होती. मठ, धर्मशाळा येथे भाविक निवारा घेत असतात तर असंख्य भाविक राहुट्या उभारून मुक्काम करीत असतात. पावसाने मात्र भाविकांची धावपळ उडवली. खाजगी निवासात देखील भाविकांची व्यवस्था केली जाते, त्या मोबदल्यात काही रक्कम घेतली जाते. पावसाची रिपरिप असल्यामुळे अनेकांनी जादा रक्कम आकारून भाविकांचे खिसे हलके देखील केले आहेत.    


पाऊस पडू दे !

राज्यभर समाधानकारक पाउस पडू दे अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी विठ्ठल चरणी केली असून  बळीराजाच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, राज्यातील जनतेसाठी जेवढे काही करता येईल तेवढे आपण करणार असून परराज्यातील देवस्थाने, तेथील रस्ते, स्वच्छ परिसर असतो तशा पद्धतीचा पंढरपूर आराखडा तयार करावा अशा सूचना आपण दिल्या असून पंढरपूरसाठी निधीत काही कमी पडू दिले जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा