Breaking

शनिवार, जुलै ०९, २०२२

मुख्यमंत्री शिंदे यांना काही अटींवर महापूजेची परवानगी !

 




मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास निवडणूक आयोगाने काही अटींवर परवानगी दिली असल्यामुळे आता शिंदे यांच्याच हस्ते महापूजा होणार आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्तेचे नाट्य सुरु होते. एकीकडे आषाढी यात्रेची तयारी सुरु होती तर दुसरीकडे राज्यात राजकारण तापले होते. मंबई, सुरत, गुवाहाटी, गोवा आणि पुन्हा मुंबई एवढा प्रवास सत्तानाट्याच्या राजकारणाने केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. ठाकरे यांच्या हस्ते आषाढीची महापूजा होईल असे वाटत असतानाच ते पायउतार झाले आणि त्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेवून पंढरीच्या महापूजेसाठी येतील हे जवळ जवळ निश्चित मानले जात होते. राजकारणाने पुन्हा अचानक वेगळेच वळण घेतले आणि बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले आणि या नव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होणार हे निश्चित झाले. त्यांचा दौराही जाहीर झाला पण त्यांच्या हस्ते पूजा होतेय की नाही ? असा सवाल निर्माण झाला होता. 


काल अचानक निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिकांची निवडणूक घोषित केली आणि त्यासोबत आचारसंहिता लागू झाली. या आचारसंहितेत महापूजा करणे अडचणीचे ठरले होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने तातडीने राज्य निवडणूक आयोगाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत परवानगी मागितली. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी ही परवानगी मागण्यात आली होती. अखेर निवडणूक आयोगाने काही अटींसह हिरवा कंदील दाखवला असून आषाढीची महापूजा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते होणार आहे. (Mahapuja allowed to Chief Minister Shinde on certain condition)  


या अटींवर मान्यता !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यास सशर्त परवानगी देताना निवडणूक आयोगाने काही अटी घातलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्याही निधीची आणि कार्यक्रमाची घोषणा या दौऱ्यात करता येणार नाही, पंढरपूर येथे ठरलेल्या कार्यक्रमासाठी परवानगी घेणे आवश्यक असून कार्यकर्ता मेळावा घ्यायचा असल्यास ठराविक अटींचे पालन करावे लागणार आहे 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा