Breaking

शनिवार, जुलै ०९, २०२२

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा महावितरणला शॉक !

 


सांगोला : महावितरण विभागाचा वायरमन दहा हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडला असून या घटनेने महावितरण विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 


गेल्या काही काळापासून लाचेचे प्रकार अधिक वाढले असल्याचे दिसत असून पोलीस, महसूल विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. अनेकांना दणका बसला असतानाही अनेकांना लाचेचा मोह आवरत नाही आणि काही किरकोळ रकमेसाठी नोकरी देखील धोक्यात आणली जाते, महावितरण विभागात देखील अनेक कर्मचारी आणि अधिकारीही लाच घेताना पकडले जात आहेत त्यातच केवळ दहा हजार रुपयांची लाच घेताना सांगोला येथील एक वायरमन पकडला गेला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा मोठा शॉक महावितरणला बसला आहे. सांगोला येथील वायरमन राहुल बिरबल गंगणे यास लाच घेताना पकडले असून वीज चोरी प्रकरणात ५० हजाराचा दंड न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे हे प्रकरण आहे. 


तक्रारदाराच्या घरात काही दिवसांपूर्वी वीज गेल्याने वायर काढून मीटरची तपासणी केली . तीच वायर परत मीटरला जोडली . परंतु वायर जोडते वेळी तक्रारदार यांनी चुकीची वायर जोडणी केली . दरम्यान वायरमन राहुल गंगणे याने २ जुलै रोजी तक्रारदार यांच्या घरातील मीटर तपासून त्याचा फोटो काढला . विजेच्या मीटरमध्ये त्यांनी छेडछाड केल्याची बाब निदर्शनास आली . हा प्रकार पाहता तक्रारदार यांना ५० हजार रुपये दंड होईल असे सांगितले . दंड न करण्यासाठी साहेबांना बोलून त्यांना १० हजार रुपये द्यावे लागतील असे सांगत लाच मागितली . दरम्यान तक्रारदाराने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली . सापळा रचून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वायरमन राहुल गंगणे यास रंगेहाथ पकडले.

 

कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच वायरमन याने मागितली परंतु तक्रारदार यांना ही लाच देणे मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवर सदर विभागाने पडताळणी केली आणि नंतर सापळा लावला. या सापळ्यात सदर वायरमन लाच घेताना रंगेहात सापडला असून वायरमन राहुल बिरबल गंगणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने महावितरण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा