Breaking

गुरुवार, जून ०२, २०२२

सावधान ! वाहन चालकांचे ड्रायव्हींग लायसन्स निलंबित होतेय !



सोलापूर : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या बारा वाहन चालकांचा परवाना सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आला असून मद्यपी वाहन चालकांना पाच हजाराचा दंड देखील न्यायालयाने केला आहे.


अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून अत्यंत वेगात आणि बेपर्वाईने वाहने चालवली जातात. यात अनेक निरपराध व्यक्तींचा बळी जात आहे तरी देखील वाहन चालक सुधारताना दिसत नाहीत, त्यातच कित्येक वाहन चालक मद्य प्राशन करून वाहने चालवितात. वाहतूक कायद्याशी कसलेही देणेघेणे न बाळगता जीवघेणी वाहतूक रस्त्यारस्त्यावर पाहायला मिळते परंतु यांना लगाम लागताना दिसत नाही. मोटार वाहन कायदे पुरेशे असले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आणि अनेक बेमुर्वतखोर इतरांच्या जीवाला धोका करीत सुसाट सुटलेले असतात. (Alcoholic driver's license suspended) मद्यपान करून वाहन चालवणे गुन्हा आहे हे माहित असतानाही अनेक तळीराम आपली वाहने रस्त्यावरून दामटत असतात पण अशा चालकांना आता चांगलाच चाप लावण्यात आला आहे. 


मद्यप्राशन करून सतत वाहने चालविणाऱ्या बेपर्वा वाहन चालकांना अनेकदा समज देवून आणि त्यानंतर अनेकदा कारवाई करून देखील त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा मद्यपान करून वाहन चालविले जाते अशा वाहन चालकांना ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे तसेच १२ वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित देखील करण्यात आला आहे. नशेत वाहने चालविणाऱ्या वाहन चालकाला हा मोठा दणका असून आता तरी तळीराम मंडळी वठणीवर येण्याची अपेक्षा आहे. नशेत वाहन चालविल्यामुळे निश्चितपणे अपघात होतात आणि यात कुणाचा जीव जातो तर कुणाला कायमचे अपंगत्व देखील येत असते. घरातील कर्ता पुरुष मयत झाला किंवा अपंग झाला तर याचा फटका पूर्ण कुटुंबाला बसत असतो. 


दंडाला जुमानत नाहीत .
वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी म्हणून पोलीस बेशिस्त आणि नियम मोडणाऱ्या चालकाच्या विरोधात काही कारवाई करतात. नियमभंग केल्यामुळे पोलीस दंड वसूल करतात पण हा दंड भरून ही मंडळी पुढे जातात. एकदा दंड भरला तरी पुन्हा तशाच प्रकारे वाहने चालवितात. यातील अनेकजण या दंडालाही जुमानत नाहीत त्यामुळे वाहतूक पोलीस आता पुढचे पाउल टाकू लागले आहेत.


थेट दोषारोपपत्र !
जुजबी दंड भरून निघून जाणारे काही वाहनचालक पुन्हा तोच गुन्हा करताना दिसतात, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वारंवार नशेत वाहन चालविणाऱ्या चालकांच्या विरोधात थेट मोटार वाहन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आणि बारा वाहन चालकांचे परवाने सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहेत. 


कायमस्वरूपी निलंबन 
अनेकदा कारवाई करून आणि न्यायालयाने दंड करून देखील मद्यपी जुमानत नसतील तर त्यांचा वाहन परवाना कायम स्वरूपी रद्द करण्यात यावा आणि याची माहिती परिवहन विभागाला कळविण्यात यावी असे देखील मोटार वाहन न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. 


   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा