पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्त १४ जुलै पर्यंत चार बस स्थानकातून यात्रा स्पेशल गाड्या सुटणार असून पंढरीचे नवे आणि जुने बसस्थानक तीन दिवसांसाठी वाहतुकीसाठी तीन दिवस बंद ठेवले जाणार आहे.
आषाढी यात्रेनिमित्त भाविक पंढरीत दाखल होत असून संत श्रेष्ठांच्या पालखी सोहळ्याचे देखील सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. मजल दरमजल करीत भाविक पंढरीकडे येत आहेत आणि भाविकांच्या सर्वांगीण सुविधासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. रेल्वेने भाविकांच्या सोयीसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत तर राज्य परिवहन महामंडळाने देखील भाविकांच्या प्रवासासाठी जादा गाड्यांची सोय केली आहे. पंढरीत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चार बस स्थानकातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तसेच वेगवेगळ्या विभागांच्या बस वेगवेगळ्या ठिकाणावरून सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील दोन वर्षे पंढरीच्या यात्रावर कोरोनामुळे निर्बंध आले होते त्यामुळे यावर्षी भाविकांची संख्या वाढणार असून ही संख्या पंधरा लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाविकांच्या सोयीसाठी पंढरीत चार ठिकाणी यात्रा बस स्थानक उभारण्यात आले असून जुने आणि नवीन बस स्थानक मात्र ९ ते ११ जुलै या तीन दिवसांसाठी वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत. या स्थानकातून सुटणाऱ्या नियमित गाड्या चंद्रभागा बस स्थानकावरून सोडल्या जाणार आहेत. चार बस स्थानकातून ६ ते १४ जुलै या काळात स्पेशल बस सोडल्या जाणार आहेत. चंद्रभागा बस स्थानकावरून पुणे, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली व अकलूज आगाराची वाहतूक केली जाणार असून रत्नागिरी, कराड मार्गाने चिपळूण, खेद, दापोली, मंडणगड, गुहागर, सांगली, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस या बसची वाहतुंक चंद्रभागा स्थानकातून केली जाणार आहे.
सांगोला मार्ग, आयटीआय संस्था पांडुरंग बसस्थानकातून सांगोला, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी विभागाच्या गाड्या सुटणार आहेत. ६५ एकर परीसातील भीमानगर स्थानकातून बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, औरंगाबाद, जालना, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा तसेच सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, कुर्डूवाडी या आगारातील बस वाहतूक केली जाणार आहे. (Pandharpur Ashadi Yatra transport system) करकंब रस्त्यावरील विठ्ठल बसस्थानकातून अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर करमाळा आगारातील काही बस धावणार आहेत.
स्थानकावर कॅमेरे
भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व यात्रा बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून चार बस स्थानकात ७६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चंद्रभागा स्थानकावर आठ, भीमा स्थानकावर बारा, विठ्ठल स्थानकावर चार पांडुरंग स्थानकावर सात कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. जुन्या स्थानकावर २३ तर नव्या स्थानकावर २२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा