Breaking

गुरुवार, जुलै ०७, २०२२

पंढरीला जाण्यासाठी टोल माफ ! राज्य शासनाची मोठी घोषणा !




मुंबई : आषाढी वारीसाठी पंढरीला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला टोल माफी देण्याचा मोठा  निर्णय राज्य शासनाने घेतला असून भाविकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 


आषाढी यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरीला जात असतात. राज्य परिवहन महामंडळाच्या बस तसेच रेल्वेने भाविक पंढरीत दाखल होतात. राज्य परिवहन आणि  रेल्वे विभागाकडून खास आषाढी यात्रेसाठी जादा गाड्या सोडल्या जातात. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून बहुसंख्य भाविक खाजगी वाहने घेऊन पंढरीला जात असतात. खाजगी वाहन घेवून जाणे भाविकांना अधिक सोईचे ठरते. पंढरीला पोहोचून चंद्रभागा स्नान आणि विठूमाउलीचे दर्शन घेऊन लगेच आपल्या वाहनाने परत निघता येथे त्यामुळे भाविक खाजगी वाहन भाड्याने घेऊन पंढरीला जाणे पसंत करतात. काही भाविक मिळून या वाहनांचे भाडे भरून पंढरीची वारी करीत असतात. 


दूरवरून पंढरीकडे खाजगी वाहन घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या खिशाला टोल नाक्याची मोठी कात्री लागत असते. अलीकडे एक टोळ नाका ओलांडताच काही वेळात दुसरा टोल नाका येत आहे त्यामुळे प्रत्येक नाक्यावर खिसा रिकामा करावा लागत असल्यामुळे भाविकांना आर्थिक भुर्दंड सहन करीतच पंढरीच्या दिशेने जावे लागते. पुन्हा परतीच्या प्रवासाला लागल्यावर देखील प्रत्येक टोल नाक्यावर पैसे भरत पुढे जावे लागते. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी टोळमुक्त वारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांत समाधान व्यक्त होत आहे. 


पंढरीच्या आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना सर्व त्या सुविधा पुरविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेतच परंतु पंढरीला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोळ माफ केला जातो त्याच धर्तीवर पंढरीला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला टोळ माफ करण्यात आला आहे.  यासाठी वाहनावर स्टिकर्स लावण्याबाबत तसेच प्रादेशिक / उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) तसेच पोलीस यांच्याकडे नोंदणी करण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.


तब्बल दोन वर्षानंतर पंढरीची वारी होत असून भाविकांत कमालीचा उत्साह आहे. राज्य परिवहन महामंडळानेही ४ हजार ७०० बस आषाढीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. रेल्वे विभागाने देखील जादा रेल्वेची व्यवस्था केली आहे. स्थानिक पातळीवर प्रशासन सज्ज झाले असून भाविकांना सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. संतांचा पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यात दाखल झाला असून पंढरीतील वातावरण चैतन्यमय बनले आहे. भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या बस स्थानकात सीसीटीव्ही द्वारे करडी नजर ठेवली जात असून यामुळे भाविकांची सुरक्षा होत आहे. टोलमाफीचा निर्णय घेतला असल्याने भाविकांच्या खिशाला बसणारा फटका वाचला आहे आणि यामुळे भाविक समाधानी आहेत. (devotees vehicle toll free for ashadhi wari )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा