Breaking

गुरुवार, जुलै ०७, २०२२

आ. शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले !


 

मुंबई :  'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.....ओक्के हाय !' म्हणणाऱ्या सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबाबत मात्र आमदार निवास ओक्के नसल्याचेच समोर आले असून आ. पाटील हे थोडक्यात बचावले आहेत. 


शिवसेनेतून बंडखोरी करून आसामच्या गुवाहाटीत पर्यटन करून आलेले आ. शहाजी पाटील हे  'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.....ओक्के हाय !'  या संवादाने राज्यातच नव्हे तर देशभरात भलतेच प्रसिद्धीला आले. फोनवरील हा संवाद व्हायरल होताच त्याची राज्यभर चर्चा सुरु असून या वाक्याने आपल्याला मोठी प्रसिद्धी मिळवून  दिल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे  देखील मोठ्या मनाने आणि जाहीरपणे देखील सांगत आहेत. शिवसेनेच्या बंडाएवढीच चर्चा शहाजीबापूंच्या या वाक्याची झाली आणि या संवादावर काही गाण्यांची देखील निर्मिती झाली. विविध वृत्तवाहिन्यांनी कधी नव्हे एवढी प्रसिद्धी शहाजी बापू यांना दिली. 'ओक्के हाय' म्हणणाऱ्या शहाजीबापू पाटील यांच्याबाबत मात्र त्यांचे आमदारनिवास 'ओक्के' राहिले नाही. 


आकाशवाणी आमदार निवासात असलेल्या शहाजीबापू पाटील यांच्या निवासाच्या छताचा मोठा भाग कोसळला. आमदार निवासाच्या तिसऱ्या मजल्यावरील ३१२ क्रमांकाच्या निवासात ही घटना घडली. यावेळी शहाजी बापू आमदार निवासातच होते परंतु सुदैवाने ते बचावले आहेत. त्यांच्या आमदार निवासातील त्यांच्या बेडवरच छताचा मोठा भाग अचानकपणे कोसळला. यावेळी आ. शहाजीबापू पाटील हे निवासातच होते परंतु सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही. या घटनेतून बापू थोडक्यात बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच अधिकारी या निवासाकडे धावले आणि  त्यांनी पाहणी  केली. ( MLA Shahajibapu Patil escaped from the Accident)


आ. शिरसाटही बचावले

बंडखोर आमदार संजय शिरसाठ हे देखील आज एका अपघातातून बचावले आहेत. औरंगाबाद पश्चिमचे आ. संजय शिरसाठ हे देखील आज औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी एक रॅली काढली होती. या रॅलीत विमानतळापासून शंभरपेक्षा अधिक चार चाकी गाड्या आणण्यात आल्या होत्या. मर्सिडीस गाडीत उभे राहून आ. शिरसाठ आपल्या कार्यकर्त्यांना अभिवादन करीत होते. सेव्हन व्हील पुलावरून हा ताफा जात असताना समोर असलेल्या गाडीने अचानक ब्रेक मारला आणि शिरसाठ यांची गाडी समोरच्या गाडीला धडकली तर मागची गाडीही त्यांच्या गाडीला धडकली !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा