Breaking

बुधवार, जुलै ०६, २०२२

पंढरीत सुरु झाली भेसळ, दीडशे किलो पेढे केले नष्ट !




पंढरपूर : आषाढी यात्रा आली की भेसळीचे प्रमाण अधिक वाढत असून अन्न व औषध प्रशासनाने पंढरीतील एका दुकानातील १५० किलो भेसळयुक्त पेढे नष्ट करून कारवाई केली आहे.


आषाढी यात्रेसाठी विक्रमी गर्दी पंढरीत होत असते, वारकरी, भाविक जसे मोठ्या श्रद्धेने पंढरीत येत असतात तसेच अनेक हौसे गौसे देखील या गर्दीत मिसळलेले असतात. वारीसाठी मोठी गर्दी होत असल्यामुळे स्थानिक आणि परगावचे लहान मोठे व्यापारी सज्ज झालेले असतात. पंढरीच्या चार यात्रावर पंढरीची मोठी आर्थिक घडी असते. यात्राकालावधीत अनेक स्थानिक आपला नेहमीचा उद्योग व्यवसाय सोडून वारीच्या काळात वारीसाठी अनुकूल व्यवसाय करीत असतात. यात्रेसाठी मोठी गर्दी होत असल्यामुळे अशा छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आर्थिक लाभही चांगला होत असतो पण गर्दीचा फायदा उठवत ग्राहकांची फसवणूक करून पैसे कमाविणारे काही भामटे देखील या गर्दीत मिसळलेले असतात. पैशाच्या मोहापोटी ते सामान्य भाविकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येते. 


यात्रेच्या कालावधीत पंढरीत पेढ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते आणि याचाच फायदा उठवत पेढे, दूध यात मोठी भेसळ केली जात असते हे यापूर्वीही अनेकदा दिसून आले असून आता पुन्हा एक घटना उघडकीस आली आहे. आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊन ठेपली असून भाविक पंढरीत दाखल होत आहेत. संतश्रेष्ठांच्या पालखी सोहळ्याचे आगमन देखील पंढरीच्या वेशीवर झाले आहे. भक्तीचा सोहळा उत्साहात सुरु असतानाच पंढरीत एका पेढ्याच्या दुकानात भेसळ असलेले पेढे विकले जात असल्याचा प्रकार समोर आला. अन्न औषध प्रशासनाने स्टार्च असलेले ६० हजार रुपये किमतीचे १५० किलो पेढे जागेवरच नष्ट करून संबंधितावर कायदेशीर कारवाई केली आहे.  


अन्न सुरक्षा स्वयंसेवक आणि अन्न व औषध प्रशासनाचे  अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, उमेश भुसे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे पश्चिम द्वार , पंढरपूर येथील श्री पिरगौडा शिवपत्र कोट्टली यांच्या अस्थायी असलेल्या दुकानाची तपासणी केली . येथे विक्रीस ठेवण्यात आलेल्या पेढ्यांचा संशय आल्याने या पेढ्यात आयोडीन टाकून पाहिले असता या पेढ्यात स्टार्च या अन्नपदार्थाची भेसळ असल्याचे आढळून आले . या पेढ्याचे ३ अनौपचारिक अन्न नमुने घेऊन उर्वरित साठा अंदाजे १५० किलो असा ६० हजार रुपयांचा साठा जप्त करून हा पेढा भेसळयुक्त असल्याने जागेवर नष्ट करण्यात आला . याप्रकरणी भादंवि कलम २७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


दरवर्षी आषाढी यात्रेच्या कालावधीत भेसळीचे प्रमाण वाढलेले असते आणि यामुळे भाविकांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. अन्न औषध प्रशासन यात्रेच्या  वेळी सक्रीय होते परंतु एरवी यांना रान मोकळे मिळत असते. प्रशासनाने वेळोवेळी या भेसळीकडे लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी होत असते. (Adulterated food, Action of food and drug administration) आषाढी यात्रेच्या काळात आणि एरवीही पंढरपुरात दुधात होणारी भेसळ तर प्रचंड प्रमाणात असते. दूध नावाचे पांढरे पाणी चक्क महागड्या दरात विकले जाते पण यावर प्रशासनाचे नियंत्रण रहात नसल्याचेच दिसून येत असते 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा