Breaking

रविवार, जुलै ०३, २०२२

कोरोनाने उडवली पंढरपूर तालुक्याची झोप !

 



पंढरपूर : आषाढी यात्रेसाठी भाविक पंढरीत येत असतानाच कोरोनाने पंढरपूर तालुक्याची झोप उडवली आहे, पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत.


जवळपास दोन वर्षे कोरोनाने जखडून टाकलेले होते, शाळेपासून व्यवसायापर्यंत सगळीकडे कुलूप लागले आणि नागरिकांचे बळी देखील गेले. तिसरी लाट ओसरू लागल्यापासून चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाली होती आणि चौथी लाट येणार की नाही येणार या चर्चेतच देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. रुग्णांच्या या वाढीचा वेग पाहता चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. अर्थात एवढे मोठे संकट पुन्हा येऊ घातले असतानाही नागरिक अजूनही बेफिकीर असल्याचे दिसत आहे. ((Fourth wave of corona) कोरोनाच्या आक्रमणाने प्रचंड नुकसान केले असतानाही अजूनही या महामारीला गंभीरपणे घेतले जात नाही असेच दिसून येत आहे. 


कोरोनाची चौथी लाट आली आहे किंवा नाही याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही परंतु सगळीकडेच कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सक्रीय कोरोना रुग्ण नाममात्र उरले होते आणि वाढ देखील थांबलेली होती परंतु आता पुन्हा ही वाढ वेगवान दिसू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका हा पहिल्या लाटेपासूनच आघाडीवर राहिला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पंढरपूर तालुक्यातच आढळले आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या देखील पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक नोंदली गेली आहे. नव्याने कोरोना वाढत असताना सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण पुन्हा पंढरपूर तालुक्यातच पाहायला मिळू लागले आहेत. 


पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे राज्यातील भाविकांची वर्दळ असते. राज्याच्या कोनाकोपऱ्यातून हजारो भाविक पंढरीत येत असतात त्यामुळे येथे कोरोनाची अधिक भीती असते. आता तर कोरोना वाढत असताना आषाढी यात्रा भरू लागली आहे. दोन वर्षे वारी झाली नसल्यामुळे यंदा विक्रमी गर्दी तर होणारच आहे पण भाविकांत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. दुसरीकडे मात्र कोरोना फोफावत असून पंढरपूर तालुक्यातील रुग्णांची संख्या ही पुन्हा एकदा जिल्ह्यात सर्वाधिक झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांत भीतीचे सावट पसरू लागले आहे. आषाढीचा सोहळा साजरा झाल्यानंतरची पंढरपूरची परिस्थिती नक्की कशी असेल याचीही चिंता व्यक्त होत आहे. 


सोलापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले असून पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. आषाढी वारीसाठी भाविक पंढरीत येवू लागले असतानाच कोरोनाचे संकट पुन्हा प्रबळ होऊ लागले आहे. कालच्या अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यात १४० चाचण्यात १८ जण कोरोनाबाधित आढळून आले. सोलापूर ग्रामीण विभागात एकूण ७५ सक्रीय रुग्ण असून यातील ३३ रुग्ण हे पंढरपूर तालुक्यातील आहेत. अक्कलकोट तालुक्यात १,  माळशिरस -११, माढा - ९, बार्शी - ८, मंगळवेढा - ६, मोहोळ -२, उत्तर सोलापूर- १, सांगोला- २, दक्षिण सोलापूर- २ अशा रुग्णांचा समावेश आहे. गेल्या काही काळापासून कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबले होते परंतु आता पुन्हा कोरोनामुळे पंढरपूर तालुक्यातील एक मृत्यू झाला आहे. 


पंढरीत चिंता !

कोरोना रुग्णांची सर्वत्र वाढ होत असताना सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक वाढ ही पंढरपूर तालुक्यात असल्याने आणि अशा परिस्थितीत आषाढी वारीसाठी लाखो भाविक पंढरीत येत आहेत त्यामुळे पंढरीत चिंतेचे वातावरण  आहे. (Increase of corona patients in Pandharpur) कोरोनाने पंढरपूर तालुक्याला या आधीच मोठा धक्का दिला आहे आणि आताही जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पंढरपूर तालुक्यात आहे त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा