Breaking

शनिवार, जुलै ०२, २०२२

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्षांची शिक्षा !

 


अकोला : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना पोलिसाशी पंगा घेणे भलतेच महागात पडले असून गावंडे यांना न्यायालयाने तब्बल दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 
गेल्या काही काळापासून गल्ली ते दिल्ली आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत काही जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली असून त्यातील बहुतेक शिक्षा या शासकीय कामात अडथळा आणणे, अधिकाऱ्याशी वाद घालणे अशा प्रकारच्या आहेत. आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत अनेकांना तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या असताना आता पुन्हा राज्यातील शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांना न्यायालयाने दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पोलिसाशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी गावंडे यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. दोन वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा त्यांना सुनावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आणि गावंडे समर्थकांत एकच खळबळ उडाली आहे. 

 
अकोला येथील अग्रसेन चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी हुज्जत घातली होती. सदर पोलिसाने गावंडे यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर रामदास पेठ पोलीसानी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गावंडे यांच्यासह चार जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात झाली आणि न्या. व्ही डी गव्हाणे यांनी गावंडे यांना शिक्षा सुनावली. 


समोर आलेले सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी याच्या आधारे गावंडे यांना शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी (भारतीय दंड विधान कलम ३५३) दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे, शिवाय पाच हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. (Former Minister Gulabrao Gawande sentenced to two years) याशिवाय भारतीय दंड विधान कलम २९४ अन्वये २ हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. गावंडे यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन आरोपींची मात्र सबळ पुराव्याच्या अभावी मुक्तता करण्यात आली आहे.    



अधिक बातम्यासाठी * येथे क्लिक * करा ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा