Breaking

शनिवार, जुलै ०२, २०२२

पंढरीकडे येणाऱ्या वारकऱ्याचा अपघातात मृत्यू !

 


पंढरपूर : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असून आज पंढरपूर - शेटफळ मार्गावर हा अपघात झाला आहे. 


अलिकडे सर्वच रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले असून यात्रेसाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांना देखील यापूर्वी अपघाताला सामोरे जावे लागले आहे. वारकरी पायी चालत येत असताना भरधाव वाहने वारकऱ्यांना धडक देतात आणि अशा अपघातात पंढरीकडे येणाऱ्या भाविकांचा मृत्यू होतो. अशा प्रकारच्या अनेक घटना या आधी घडल्या असून आज मात्र भाविकांच्या दुचाकीला अपघात झाला आणि एक भाविक जागीच ठार झाला तर अन्य एक जण जखमी होण्याची घटना घडली आहे. छोटा हत्ती दुचाकीला धडक देवून बेपत्ता झाला आहे. जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यातील जोगलादेवी येथील अर्जुन विश्वनाथ गवते हे अशोक त्र्यंबक बलते यांच्यासोबत दुचाकीवरून पंढरपूरकडे येत असताना आष्टी शिवारात हा अपघात झाला आहे. 


पंढरीच्या आषाढी वारीसाठी अर्जुन गवते (वय ५५) आणि अशोक बलते (वय ५४) हे दोघे दुचाकीवरून (एम एच २१/ ए एफ ६३६९) पंढरपूरच्या दिशेने येत होते. शेटफळपासून पुढे आल्यानंतर आष्टी हद्दीत त्यांच्या दुचाकीला एका छोटा हत्ती टमटमने जोराची धडक दिली. चुकीच्या दिशेने येत या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अर्जुन गवते यांना जोराचा मार लागला आणि त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या डोक्याला आणि पायाला मोठ्या प्रमाणात मार बसला असल्यामुळे ते यातून वाचू शकले नाहीत. दुचाकीवर त्यांच्या मागच्या बाजूस बसलेले अशोक बलते यांना देखील या अपघातात (Accident Pandharpur- Shetafal raod) मार लागला असून ते जखमी झाले आहेत.   

 
सदर अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली असून पंढरपूर तालुक्यात मोलमजुरी करण्यासाठी आलेले आणि हल्ली सुस्ते येथे राहणारे राम भीमराव गवते (जोगलादेवी, जि. जालना) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघात करून पळून गेलेल्या छोटा हत्ती चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. (Devotee coming for Ashadi Wari dies in an accident) आषाढी वारी आता काही दिवसांवर येवून ठेपली असल्याने या घटनेने अधिकच चिंता निर्माण केली आहे.        


अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा