Breaking

शुक्रवार, जून १७, २०२२

दहावी परीक्षेत वेगळा विक्रम, सर्व विषयात ३५ गुण !

 



पुणे : परीक्षेत जेवढे जास्त गुण तेवढे त्या विद्यार्थ्याचे कौतुक होते आणि त्याची चर्चाही होत असते परंतु पुण्यातला एक विद्यार्थी काठावर पास होऊन देखील तो चर्चेचा विषय बनला  आहे. 


दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील एक मोठी परीक्षा मानली जाते. काहीही करून या परीक्षेत यश मिळवायचे असा प्रयत्न विद्यार्थ्याचा तर असतोच पण पालकांना देखील आपल्या पाल्याने दहावी पास झालेच पाहिजे असे वाटत असते  काही वर्षांपूर्वी पन्नास पंचावन्न टक्के गुण मिळाले तर पुरेसे ठरायचे पण अलीकडे ९५ टक्के गुण मिळाले तरी काही विद्यार्थी निराश होताना दिसतात. वर्षभर प्रचंड परिश्रम घेवून अनेक विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षेत वेगवेगळे विक्रम करताना दिसतात आणि त्यांची चर्चाही होत असते. पुण्यातल्या एका विद्यार्थ्याने मात्र दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयात ३५ गुण मिळवून एक वेगळा विक्रम केला आहे आणि त्याची देखील चर्चा सुरु झाली आहे. (Different record in ssc exam with thirty five marks)


नुकताच दहावीचा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थ्याची नेत्रदीपक यश मिळवले. अनेकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून उज्वल यश संपादन केले आहे. विशेषत: गेल्या काही वर्षात मुलींचीच आघाडी पाहायला मिळते. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून त्यांनी मिळवलेल्या गुणांची चर्चा होत आहे तसेच पुन्ह्याच्या गंज पेठेत राहणाऱ्या शुभम जाधव याची देखील चर्चा होताना दिसत आहे. गणित, इंग्रजी अशा विषयात अनेक विद्यार्थी ३५ गुण मिळवून कसेबसे पास होतात. अन्य विषयात ३५ पेक्षा दोन चार गुण तरी त्यांना अधिकचे मिळालेले असतात. सर्वच विषयात ३५ गुण मिळणे हे तसे दुर्मिळ असते पण शुभम जाधव या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सगळ्याच विषयात ३५ गुण मिळवले आहेत. साहजिकच याची चर्चाही सुरु आहे. 


पोलीस व्हायचंय !

पुण्याच्या रमणबाग शाळेत शिकणारा शुभम जाधव हा गंजपेठेत राहतो. तो शिक्षण घेत असला तरी देखील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करून तो घराला हातभार लावतो. शुभमचे आई वडील मजुरी करून घर चालवतात. शुभम मात्र भविष्यात पोलीस होऊ इच्छित आहे आणि यासाठी तो वाणिज्य शाखेतून शिक्षण घेवू इच्छित आहे. काम करून तो दहावी पास झाला याचे अनेकांना कौतुक तर आहेच पण त्याला सर्व विषयात ३५ गुण मिळाले असल्याची चर्चाही जोरात सुरु आहे.  

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा