Breaking

रविवार, जून ०५, २०२२

-- म्हणून पंढरीच्या विठ्ठलापुढे मी हात जोडतो - शरद पवार

 





पुणे : सामान्य माणूस पंढरीच्या विठ्ठलाला संकटमोचक मानतो, त्याचा अनादर करू नये म्हणून पंढरपूरचा विठोबा समोर असेल तर मी हात जोडतो असे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 
शरद पवार हे आस्तिक की नास्तिक हा वाद काही दिवसांपूर्वी चर्चेला आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना नास्तिक म्हटले होते त्यावरून या वादाला सुरुवात झाली होती. कुणी आस्तिक अथवा नास्तिक असावं हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय असला तरी या विषयावर बरेच राजकारण झाले होते आणि आजही अधूनमधून हा मुद्दा पुढे आणला जातो. राज ठाकरे यांनी नास्तीकतेबाबत पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीने शरद पवार यांचे काही जुने फोटो समोर आणले होते. यात शरद पवार हे हनुमानाच्या मंदिरात पूजा करताना देखील दिसले आणि आरोप करणाऱ्यांना चपराक लगावण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा या विषयावर स्वत: शरद पवार यांनीच खुलासा केला आहे.

 
नास्तिक अथवा आस्तिकतेचा प्रश्न वैयक्तिक असून त्याचा आपण गवगवा करीत नाही. पण पंढरपूर येथील विठोबा समोर असेल तर मी हात जोडतो कारण सामान्य माणूस विठ्ठलाला संकटमोचक मानतो, त्याचा अनादर करू नये म्हणून मी हात जोडतो असे शरद पवार यांनी सांगितले. शरद पवार एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता पत्रकारांनी राज ठाकरे यांच्या नास्तिकतेच्या मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता अत्यंत सहजपणे त्यांनी याबाबत उत्तर दिले. (NCP's Sharad Pawar's revelation regarding God)आस्तिक नास्तिकतेच्या तपासण्या झालेल्या नाहीत आणि तसे करणे योग्य देखील नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले. 


बाहेरून दर्शन घेतले होते


शरद पवार हे पुण्यात आल्यावर ते दगडूशेठ गणपतीला गेले पण त्यांनी बाहेरून दर्शन घेतले त्यामुळे पुन्हा हा विषय चर्चेला आला होता. मांसाहार केल्यामुळे मंदिरात जाणे आपल्याला योग्य वाटले नाही असे पवार यांनी स्पष्ट केले होते आणि त्याचे हिंदू संघटनेने स्वागत केले होते. शरद पवार यांच्या बाहेरून दर्शन घेण्याबाबत राज्यातून समाधान व्यक्त करण्यात आले होते. 


बरामतीने दिले होते उत्तर 


मी  तेरा चौदा  वेळा निवडणुकीला उभा राहिलो, माझ्या निवडणुकीचा  नारळ कुठे फुटतो हे बारामतीकराना विचारा, एकच मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी मी प्रत्येक निवडणुकीचा  नारळ फोडत असतो पण त्याचा कधीही आम्ही गाजावाजा करीत नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेनंतर दिले होते पण बारामतीकरांनी हनुमान  मंदिरात शरद पवार पूजा करीत असतानाचा एक व्हिडीओच समाज माध्यमांवर व्हायरल केला होता. त्यामुळे ठाकरे यांच्या टीकेतील हवा निघून गेली होती.        


हे देखील वाचा : (बातमीला टच करा )



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा