Breaking

शुक्रवार, जून ०३, २०२२

राज्यातील शाळा पुन्हा कोरोनाच्या संकटात !


मुंबई : मागील दोन वर्षे बंद पडलेल्या शाळा आता नव्या वर्षात देखील संकटात आल्याचे दिसत असून शाळेच्या बाबतीत जागतिक स्तरावरून काय निर्णय घेतले गेलेत याची माहिती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 


कोरोनांचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शाळांच्या दरवाजांना कुलूप लागले गेले. रोज शाळेत जाणारी मुले घरात बंदिस्त झाली आणि  नंतर ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम सुरु झाला. पर्याय नसल्याने मोबाईलच्या मदतीने लहान मुलेही अभ्यासाचे धडे घेऊ लागले पण अनेक विद्यार्थ्याकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे या शिक्षणापासून देखील त्यांना वंचित राहावे लागले. दोन वर्षात शाळा कुलूपबंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तिसरी लाट ओसरू लागताच हळूहळू शाळा सुरु झाल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली. आता नव्या वर्षात नव्या जोमाने आणि उत्साहाने शाळा सुरु होतील याची प्रतीक्षा असतानाच पुन्हा कोरोना आक्रमण करू लागला असून रुग्ण असेच वाढत राहिले तर शाळा पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. (School in Corona crisis again)  


वाढत्या रुग्णांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची महत्वाची बैठक घेतली असून आगामी पंधरा दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत असे ठाकरे यांनी सांगितले आहे. पुढील पंधरा दिवसांच्या आकडेवारीवर शासन बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. पुन्हा एकदा राज्यात निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वत: शिस्त पाळण्याची गरज आहे. लसीकरण करून घ्यावे आणि मास्कचा वापर करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धाव ठाकरे यांनी केले आहे.  जून महिना सुरु झाला असून लवकरच शाळा सुरु होणार आहेत आणि याच दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक पातळीवर शाळांच्या बाबतीत काय निर्णय घेतले आहेत आणि तेथील विद्यार्थ्यांना संसर्ग होण्यासंदर्भात काय परिस्थिती आहे याची माहिती घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. शिवाय बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढविण्याबाबत देखील सांगण्यात आले आहे. 


सात पटीने वाढ !

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असताना ही वाढ मुंबई ठाणे आणि पुणे शहरात अधिक आहे. राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येतील ९७ टक्के रुग्ण केवळ याच शहरात आहेत . दीड महिन्यांच्या कालावधीत रुग्णात सात पटीने वाढ झाली असून संसर्ग दर ६ टक्के झाला आहे. राज्यातील संसर्ग दर देखील ३ टक्क्यांवर पोहोचला आहे  


आणखी रुग्ण वाढणार !

काही दिवसांपासून कोरोना रुग्णांत वाढ होत असून ही वाढ आणखी वाढणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचण्यांचे कमी झालेले प्रमाण पुन्हा वाढविण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. यासाठी पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा