Breaking

शुक्रवार, जून ०३, २०२२

-- म्हणून संशय आला आणि 'त्यांना' झाली फाशी !




सोलापूर : अवघ्या सोळा महिन्याच्या मुलीवर अत्याचार करून गळा आवळून तिचा खून करण्याचे महापाप करणाऱ्या आई वडिलांना फाशीची शिक्षा झाली, केवळ जागरूक प्रवाशांना आलेल्या संशयाने त्यांना फासापर्यंत पोहोचवले आहे. 


आपल्याच दीड वर्षे वयाच्या मुलीवर जन्मदात्या बापाने अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुकल्या मुलीचा मृतदेह घेवून क्रूरकर्मा बाप आणि आणि वातानुकुलीत रेल्वेने आपल्या मुळ गावी निघाले होते. त्यांना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांचे बिंग फुटले. जलदगती न्यायालयात हा खटला चालला आणि जानेवारी मध्ये घडलेल्या या क्रूर गुन्ह्याचा निकाल सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने दिला. राक्षसी आणि अमानवी कृत्य करणाऱ्या बापास आणि त्याला साथ देणाऱ्या आईस जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची मोठी शिक्षा सुनावली. पोलिसांनी अत्यंत योग्य मार्गाने आणि जलदगतीने हा तपास पूर्ण केला आणि दोन्ही आरोपीवरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला !


आपल्या घरात कृत्य करून पुरावा संपविण्यासाठी १६ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह घेवून ते काहीच घडले नाही असे दाखवत रेल्वेने आपल्या मूळ गावी निघाले होते. सिकंदराबाद - राजकोट या एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास मृतदेहासोबत सुरु होता. विशेष म्हणजे मृतदेहाचा वास येवू नये यासाठी या नराधमाने वातानुकुलीत डब्यातून प्रवास करण्याचा मार्ग निवडला होता. सिकंदराबाद येथे हे जोडपे रेल्वेत बसले पण प्रवासात एकदाही बाळ रडले नाही. एवढ्या प्रवासात एकदाही बाळ रडले नाही की त्याने कसली हालचाल देखील केली नाही त्यामुळे सहप्रवाशांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. (Doubts to passengers and they were hanged) प्रवासाच्या धकाधकीत कुठलेही बाळ रडत असते. या जोडप्याजवळ असलेले बाळ लांब पल्ल्याच्या प्रवासात देखील एकदम शांतच असल्याचे सोबतच्या प्रवाशांच्या मनात शंका आली. काहीतरी वेगळा प्रकार असावा असा अंदाजच काही प्रवाशांना आला.   

 

धावत्या रेल्वेत दुसरे काही करण्यासारखे नव्हते म्हणून त्यांनी तिकीट तपासणीसास याबाबतची माहिती दिली. त्यांनी वाडी रेल्वे स्टेशनवर गाडी आल्यानंतर या जोडप्याकडे बाळाबाबत चौकशी केली.  गुन्हेगार असलेल्या जोडप्याने आपल्या देहबोलीवरून काही शंका येवू दिली नाही पण त्यांनी दिलेली उत्तरे ही असमाधानकारक आणि न पटणारी होती. दरम्यान रेल्वेने वाडी स्थानक सोडलेले होते आणि संशय अधिक बळावला होता. सोलापूरच्या रेल्वे पोलिसांना या प्रकारची माहिती पोहोचविण्यात आली आणि पोलीस ही रेल्वे येण्याची वाट पाहत सोलापूर स्थानकावर थांबले. गाडी सोलापूर स्थानकात येताच पोलिसांनी या जोडप्याकडे चौकशी केली आणि या चौकशीत त्यांना काही काळेबेरे असल्याचे दिसल्याने त्यांना सोलापूर स्थानकावरच उतरविण्यात आले. 


दीड वर्षाच्या बाळाला पोलिसांनी रुग्णालयात नेले असता सदर बाळ मृतावस्थेत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यानंतर पोलिसांना अधिकच संशय आला. जोडप्यांनी दिलेली उत्तरे आणि त्यांच्यासोबत मुलीचा मृतदेह असणे हे सगळेच शंकास्पद असल्याचे स्पष्ट झाले होते. बाळाच्या मृतदेहाची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर धक्कादायक खुलासा समोर आला. अवघ्या १६ महिने वयाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची माहिती वैद्यकीय तपासणीत समोर आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आणि न्यायालयाने या मुलीच्या आई वडिलांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली !


सोळावी फाशी !

सोलापूरच्या सत्र न्यायालयात या आधी पंधरा आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती त्यानंतर ही सोळावी फाशीची शिक्षा असल्याचे जेष्ठ विधिज्ञ धनंजय माने यांनी सांगितले. बार्शी तालुक्यातील एक, मोहोळ तालुक्यातील एक तर माढा तालुक्यातील पाच जणांना फाशीची शिक्षा सोलापूर न्यायालयात झाली होती. अकलूज येथील प्राध्यापकांच्या पत्नीचा सोलापुरात खून झाला होता. याप्रकरणी एका आरोपीस फाशीची शिक्षा झाली होती. सोलापूर न्यायलयात सुमारे १५ जणांना या आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे अशी माहितीही ऍड धनंजय माने यांनी दिली.   


हे देखील वाचा : (बातमीला टच करा )


महाराष्ट्रातील शाळा पुन्हा कोरोनाच्या संकटात !


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा