Breaking

शनिवार, जून ०४, २०२२

मान्सूनचा प्रवास पुन्हा एकदा वाटेतच खोळंबला !

 



शेतकरी पावसासाठी आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतानाच पुन्हा एकदा मान्सून रस्त्यातच खोळंबला असून पाऊस येण्याऐवजी उष्णतेचीच लाट आली आहे.


संपूर्ण उन्हाळ्यात राज्यात विचित्र हवामान सुरु राहिले होते. काही भागात पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट अशा हवामानाचा सतत अनुभव यावर्षी आला. अवकाळी पाऊस, गारपीठ यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक द्राक्ष बागाईतदारांनी जीवापाड जपलेली द्राक्ष अखेरच्या क्षणी तोडून फेकून दिली. अवकाळीच्या तडाख्याने बळीराजाच्या डोळ्यातून पाणी आणले. केळीच्या बागा देखील जमिनीवर झोपल्या. जपलेली, वाढवलेली पिके अंतिम टप्प्यात आल्यानंतर बसलेला हा तडाखा शेतकऱ्यांसाठी असह्य झाला. सगळे संकट पचवत शेतकरी पुन्हा पावसाची वाट पहात आहे आणि येणार येणार म्हणून वाजत गाजत असलेला मान्सून पुन्हा एकदा हुलकावणी देवू लागला आहे. 


यावर्षी सगळीकडेच चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान अंदाज देणाऱ्या सर्वच संस्थांनी दिला असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. दरवर्षीच्या पावसावर अर्थचक्र अवलंबून असते त्यामुळे पावसाला आर्थिक गणिताच्या दृष्टीने अधिक महत्व असते. पावसाने दगा दिला की बाजारातील परिस्थिती प्रतिकूल होत जाते. यावर्षी चांगला पाऊस येणार असून तो वेळेआधी दाखल होईल असे देखील हवामान विभागाकडून वेळोवेळी सांगितले गेले आणि अंदमानात तो वेळेच्या आधीच दाखल झाला होता. (The journey of the monsoon was once again delayed) पुढे थोडासा खोळंबून केरळमध्येही वेळेपूर्वी दाखल झाला आणि राज्यात देखील वेळेच्या आधीच त्याचे आगमन होईल असे सांगण्यात आले. हवामान विभागाच्या या दिलासादायक अंदाजामुळे शेतकरी सुखावला पण वाटेवर असलेला पाऊस सुरुवातीलाच हुलकावणी देवू लागला आहे.

 
पावसाचा जोर !
महाराष्ट्रात पावसाची जोरदार प्रतीक्षा केली जात असताना तो अपेक्षित वेगाने पुढे सरकताना दिसत नाही पण बंगालच्या उपसागरात मान्सूनचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात चांगला पावूस होत असून मान्सून आता हिमालयापर्यंत पोहोचला आहे. अरबी समुद्रात मात्र पोषक वातावरण तयार झाले नाही. 


मान्सून लांबणीवर !
वेळेच्या आधी दाखल होण्याची अपेक्षा असलेला मान्सून पुन्हा एकदा खोळंबला असून नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रवेशासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण नाही त्यामुळे राज्यातील पाऊस लांबू लागला आहे. कर्नाटकमधील कारवार येथेच गेल्या तीन दिवसांपासून तो थांबला आहे.


उष्णतेची लाट !
राज्याला पावसाची प्रतीक्षा असताना पावसाऐवजी उष्णतेची लाट आली आहे. उत्तरेकडील कोरड्या आणि उष्ण वाऱ्यामुळे विदर्भ आणि काही भागात उष्णतेची लाट असून सदर लाट दोन दिवस कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.     


हे देखील वाचा : (बातमीला टच करा )



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा