Breaking

सोमवार, जून १३, २०२२

दामाजी कारखाना निवडणूक : प्रबळ उमेदवारांचे आव्हान छाननीतच संपुष्टात !

 



मंगळवेढा : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत हरकती घेण्यात आलेल्या ९६ उमेदवारी अर्जातील विरोधी समविचारी गटाच्या हरकती फेटाळण्यात आल्या तर सत्ताधारी गटाच्या हरकती मान्य करण्यात आल्या आहेत.


मंगळवेढा येथील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत आहे आणि विविध वादाची झालर या निवडणुकीला लागलेली आहे. सदर निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात ४९९ अर्जांची छाननी शुक्रवारी झाली होती यात ३ अर्ज बाद ठरले गेले होते तर उर्वरित ९६ अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला होता. दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या तसेच संचालक मंडळाच्या उमेदवारी अर्जावर जोरदार हरकती घेण्यात आल्याने वातावरण गरमागरम झालेले पहायला मिळाले होते. 


संचालक राजेंद्र सुरवसे यांनी कारखान्यास गाळपासाठी उस दिलेला नसल्याबाबत राहुल शहा, चंद्रशेखर कोंडूभैरी, सोमनाथ बुराजे, अजित जगताप यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. तर जगताप, कोंडूभैरी यांनी संचालक बबनराव आवताडे, संजय पवार, महादेव लवटे यांना वगळून मंगळवेढा उस उत्पादक गटातील उमेदवारावर बळीराज पतसंस्थेचे दाखले जोडत ते थकबाकीदार असल्याची हरकत घेण्यात आली होती.


विद्यमान चेअरमन आणि आमदार समाधान आवताडे यांच्या विरोधी गटातील समविचारी पदाधिकारी यांनी संचालक मंडळाच्या उमेदवारीवर हरकती नोंदल्या होत्या. आवताडे गटाने व्यक्तिगत थकबाकीदार नसल्याचा युक्तीवर वकिलाच्या मार्फत केला होता परंतु त्यावरील निर्णय देखील राखून ठेवण्यात  आला होता. परिचारक गटाच्या दोन उमेदवारांच्या विरोधातही हरकती घेण्यात आल्या आहेत. 


सत्ताधारी गटाच्या हरकती मान्य करण्यात आल्या असून समविचारी गटाच्या हरकती मात्र फेटाळण्यात आल्या आहेत त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्याच्या आधीच समविचारी गटातील प्रमुख उमेदवारांचे आव्हान संपुष्टात आले आहे . आ. समाधान आवताडे, राजेंद्र सुरवसे, लक्ष्मण जगताप यांचे अर्ज मंजूर करण्यात आले तर राहुल शहा, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडूभैरी, सोमनाथ बुरसे, विजय खवतोडे, ज्ञानेश्वर भगरे, रामचंद्र वाकडे, राजेंद्र हजारे, संजय कट्टे यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा