Breaking

गुरुवार, जून ०२, २०२२

अजित पवार म्हणाले, "--- तर कठोर निर्णय घ्यावाच लागेल" !

 



मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो असे राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत स्पष्टपणे आज सांगितले असून परिस्थितीनुसार निर्बंध लागण्याचेच हे संकेत मानले जात आहेत. 


कोरोनाची तिसरी लाट ओसरत निघाली तशी चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाली . जून महिन्यात कोरोनाची ही चौथी लाट येण्याचा अंदाज अभ्यासकांनी दिला आहे आणि मे महिन्यांपासूनच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. मुंबई, ठाणे येथे तर रोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून या संख्येत दररोज वाढ होत चालली आहे त्यामुळे शासन पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आले आहे. रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने राज्य शासनाने निर्बंध हटवले आहे परंतु सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सक्ती नाही म्हटले की कुणीही मास्क वापरत नसल्याचे दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार हे मात्र कायम मास्क चा वापर करताना दिसत आहेत. 


राज्यात रुग्ण वाढू लागल्याने निर्बंध पुन्हा लागू केले जाणार की काय याबाबत राज्यात चर्चा सुरु झाली आहे. राज्यात दिवसागणिक वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता चौथी लाट येतेय की काय ? अशी भीती आता अधिक गडद झाली आहे. काल राज्यात १ हजार ८१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून यातील ७३९ रुग्ण हे मुंबईतीलच आहेत. (Ajit Pawar said, tough decision can be taken) अवघ्या तीन दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे त्यामुळे अधिक चिंता निर्माण होत आहे. 


अजित पवार म्हणाले ---
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे, जर कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत गेली तर परिस्थिती कशी हाताबाहेर जाते हे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सर्वानीच पहिले आहे. शासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे पण कोरोना बाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मात्र कठोर निर्णय घेतला जाऊ शकतो. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा ! 


सक्रीय रुग्ण वाढले
कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत परंतु रुग्णालयात दाखल होण्याची वेळ अजून तरी रुग्णांवर येताना दिसत नाही. राज्यात कोरोना रुग्णांची सक्रीय संख्या ४ हजार ३२ एवढी झाली असून मृत्यू दर १.८७ टक्के एवढा आहे. सद्या फार चिंतेचे वातावरण नसले तरी दक्षता घेण्याची मात्र अत्यावश्यकता निर्माण होऊ लागली आहे. 

पंधरा दिवस महत्वाचे 

राज्यात कोरोना वाढत असून पुढील पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येवर शासन लक्ष ठेवून आहे, निर्बंध नको असतील तर नागरिकांनी शिस्त पाळून मास्कचा वापर करावा आणि लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा