Breaking

शनिवार, जून ०४, २०२२

आयपीएल अंतिम क्रिकेट सामन्यात फिक्सिंग झाल्याचा आरोप !

 


टाटा आयपीएल च्या अंतिम क्रिकेट सामन्यात फिक्सिंग झाल्याचा मोठा आरोप भाजपचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पुत्र जय शहा यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. 


क्रिकेट सामन्यातील फिक्सिंग प्रकरण आता काही नवे राहिले नसून प्रथम दर्जाच्या सामान्यात देखील फिक्सिंग करून प्रेक्षकांची फसवणूक करण्यात आल्याची प्रकरणे समोर आली आहेत आणि ती वादळी देखील ठरली आहेत. भारतासह विदेशातीलही काही क्रिकेट खेळाडूंवर फिक्सिंग केल्याचे आरोप झाले आणि एकही खेळाडूना याची शिक्षाही भोगावी लागली आहे. जागतिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय असणारा क्रिकेटसारखा खेळ फिक्सिंग प्रकरणामुळे बदनाम झाला आणि अशा घटना समोर येत राहिल्यापासून अनेक प्रेक्षकांनी देखील क्रिकेटकडे पाठ फिरवली आणि क्रिकेटचे मोठे नुकसान झाले आहे. फिक्सिंगची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आल्यावर गेल्या काही काळापासून अशी नवी प्रकरणे समोर आली नाहीत परंतु आता आयपीएल मधील अंतिम सामन्यात फिक्सिंग केल्याचा आरोप भाजपचेच खासदार आणि नेत्यांनी केला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. 


भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा हे बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ)  सचिव आहेत आणि आरोप करणारे खासदार स्वामी हे भाजपचेच आहेत आणि त्यांनीच अमित शहा आणि त्यांच्या पुत्रावर गंभीर आरोप केला असल्याने क्रीडा क्षेत्रासह राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. स्वामी यांनी ट्वीट करून हा सनसनाटी आरोप केला आहे. भाजपचेच नेते आणि खासदार असलेल्या 
सुब्रमण्यम स्वामी यांनी बीसीसीआयवर निशाणा साधत त्यांच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि त्यांचे पुत्र जय शहा यांच्यावर त्यांनी जोरदार प्रहार केला आहे.


गुप्तचर संघटनांच्या माहितीचा देखील त्यांनी हवाला दिला आहे त्यामुळे या आरोपातील महत्व अधिक वाढले आहे. (Allegations of fixing in IPL final cricket match)आयपीएलच्या अंतिम सामन्यात मोठा घोटाळा झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी स्वामी यांनी केली असून या प्रकरणात जनहित याचिका दाखल केली जाण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


राजीनामाच हवा !
भाजप नेते स्वामी यांनी भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याच राजीनाम्याची आवश्यकता आहे असे म्हटले आहे. त्यांना अलीकडे क्रिकेटमध्ये अधिक रस वाटू लागला असून त्यांना क्रीडा मंत्रालय देण्यात यावे. २९ मे रोजी आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी अमित शहा स्टेडीयमवर गेले होते, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी हिंदुना टार्गेट केलेले असून थैमान घातलेले असताना देशाचे गृहमंत्री क्रिकेटचा आनंद कसा घेतात ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.   


हे देखील वाचा : (बातमीला टच करा )



अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा