Breaking

मंगळवार, जुलै ०५, २०२२

बनावट सही शिक्क्याने खरेदीखत, चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल !


 

पंढरपूर : तलाठ्याचा बनावट सही शिक्का वापरून करण्यात आलेल्या खरेदीखताच्या प्रकरणी खरेदीदार, विक्री करणारा आणि दोन साक्षीदार अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


खरेदी विक्री व्यवहारात कोण कधी काय गैरप्रकार करील हे काही सांगता येत नाही. नकली मालक उभा करून जमिनीची विक्री केली जाते तर कधी एकच प्लॉट अनेकांना विकल्याची बरीच उदाहरणे समोर आली आहेत. अशा व्यवहारात फसवणुकीचेच प्रकार अधिक घडतात. खरेदी विक्री व्यवहारात पारदर्शकता राहावी म्हणून शासन आणि प्रशासन सतत दक्ष असते तरी देखील काही भामटे फसवणुकीचा धंदा करीत असतातच. खरेदी विक्री व्यवहारात मुद्रांक शुल्क शासनाला द्यावे लागते पण हे चुकविण्यासाठी अनेक मार्ग देखील शोधले जातात. पंढरपूर तालुक्यात मात्र मुद्रांक शुल्क चुकविण्यासाठी वेगळाच फंडा वापरण्यात आला आणि चौघे जण भलतेच गोत्यात आले. 


जमिनीचे खरेदीखत करताना मुद्रांक शुल्क वाचविण्यासाठी तलाठ्याचा बनावट सही शिक्का, बनावट पंचनामा, बनावट मुल्यांकन असा प्रकार करण्यात आला पण तो उघडकीस आला. शिरढोण -माळवाडी  येथील दर्लिंग बाळासाहेब भूसनर, संभाजी बाळासाहेब भूसनर, सीताराम किसन रानगर, माळशिरस तालुक्यातील मिरे येथील रावसाहेब वामन जोरवर या चौघांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील तलाठी अब्दुल सलीम चांदकोटे यांनी तहसीलदार यांच्या आदेशावरून फिर्याद दिल्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Purchase of land by fake signature and stamp of Talathi)


रावसाहेब जोरवर याची शिरढोण येथील ४१ गुंठे जमीन दर्लिंग भूसनर याने खरेदी केली होती. या व्यवहारात २ लाख ८ हजार ३५० रुपयांचे मुद्रांक शुल्क शासनाकडे जमा करणे आवश्यक होते. हे शुल्क वाचविण्यासाठी तलाठ्याचा बनावट सही शिक्का बनवून पंचनामा केल्याचे दाखवून राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे पत्र मिळवले गेले. सदर जमिनीचे मूल्य ३५ लाख ६७ हजार असताना फक्त ५ लाख ७५ हजार रुपयांचे मूल्य दाखविण्यात आले. २ लाख ८ हजार ३५० रुपयांचे मुद्रांक शुल्क शासनाकडे भरण्याऐवजी केवळ २८ हजार ८०० रुपयांचे शुल्क शासनाकडे जमा करण्यात आले. त्यामुळे शासनाचे १ लाख ७९ हजार ५५० रुपयांचे नुकसान आणि फसवणूक करण्यात आली. 


--आणि उघडकीस आले ! 
सदर आरोपींनी मुद्रांक शुल्क वाचविण्यासाठी विविध युक्त्या केल्या, त्यासाठी खोटेपणाचा आधार घेतला पण जेंव्हा या जमिनीच्या खरेदीची ऑनलाईन नोंद करताना हा सगळाच प्रकार आपोआप उघडकीस आला. संबंधित तलाठी यांनी लगेच आपला अहवाल तहसीलदार यांना सादर केला. त्यानुसार तहसीलदार यांनी संबंधीतांवर फिर्याद देण्याचे आदेश केले. त्यानुसार चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून यात खरेदी करणारा, विक्री करणारा आणि दोन साक्षीदारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा