Breaking

गुरुवार, जून ०९, २०२२

भीमा पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान !

 


पंढरपूर : भीमा पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला आणि सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. .


शासनाच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांना तारेवरची कसरत करीत काम करावे लागत आहे. एका कर्मचाऱ्यास अनेक कार्यभार सांभाळावे लागत आहेत. भीमा पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तर प्रचंड ताण येत आहे. अत्यंत कमी कर्मचारी वर्गावर भीमा पाटबंधारे विभागाला काम करावे लागत आहे तर शाखा कार्यालयात नाममात्र कर्मचारीच असल्याने सिंचनाचे काम करणे या विभागाला प्रचंड कठीण झाले आहे. नवी पद भरती नाही आणि जुने कर्मचारी, अधिकारी दरवर्षी सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे मोजक्या अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी सिंचनाने काम करणे हे आव्हानात्मक असतानाच आता पुन्हा भीमा पाटबंधारे विभागातील दहा कर्मचारी अधिकारी निवृत्त झाले आहेत. 

आव्हानात्मक परिस्थितीत काम करून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचारी यांचा भीमा पाटबंधारे विभागाच्या वतीने सत्कार करून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले आणि सन्मानाने त्यांना निरोप देण्यात आला. भीमा पाटबंधारे विभागांतर्गत अधिकारी आणि कर्मचारी मिळून दहा जण यावेळी सेवानिवृत्त झालेले आहेत. यात उजनी कालवा उपविभाग क्र. ५२ मंगळवेढा या कार्यालयाचे उप विभागीय अधिकारी सिद्धेश्वर काळुंगे यांच्यासह नंदू शिंदे, गोपाळ शिंदे, बी. डी. कांगरे, एम एन तारळेकर, बाळू अवघडे, बाळू रोकडे, एन पी पाटील, एन एन मोहिते, एस एस नाईक आदींचा समावेश आहे. भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस के हरसुरे यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. सर विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी महेश चौगुले, ज्योती इंगवले, कल्याणराव देशमुख, सिद्धेश्वर पाटील यांच्यासह विभागातील आणि उपविभागातील कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  विभागीय कार्यालयाचे प्रथम लिपिक विजय खटकाळे यांनी केले.

.



कर्मचाऱ्यांचे कौतुक 
अत्यंत जिव्हाळ्याच्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांचा विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला. कार्यकारी अभियंता श्री हरसुरे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त करताना कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. उप विभागीय अधिकारी सिद्धेश्वर काळुंगे यांना सिंचन व्यवस्थापनाचा मोठा अनुभव होता त्यांच्याकडील शाखेतून शंभर टक्के वसुलीसह अंत्यत चांगले काम त्यांनी केले आहे, कर्मचाऱ्यांनी देखील त्यांची पदे नसताना पाणी अर्ज भरून घेणे, पाणीपट्टी वसुली, वेळेच्या वेळी गेज देणे, लिहिता येत नसताना देखील इतरांच्या मदतीने आकारणी तक्ते तयार करून कामे पूर्ण करणे अशी सिंचनाची विविध कामे योग्य पद्धतीने हाताळली अशा शब्दात त्यांचा गौरव करण्यात आला. 


एस बी पाटील यांचा सत्कार 
भीमा पाटबंधारे विभागात अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने तसेच सर्वांना बरोबर घेवून अनेक वर्षे काम केलेले एस. बी. तथा सिद्धेश्वर पाटील यांना अलीकडेच उप विभागीय अधिकारी पदी पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे मंगळवेढा येथील उजनी कालवा उपविभाग क्र ५२ चा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. हा कार्यभार घेतल्याबद्धल उप विभागीय अधिकारी सिद्धेश्वर पाटील यांचा सत्कार कार्यकरी अभियंता एस के हरसुरे यांच्या हस्ते करण्यात आला.


      अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा