Breaking

रविवार, मे २९, २०२२

गावाची सोसायटी आणि मतदार मात्र दोन तालुक्याचे ! आरोप प्रत्यारोप सुरु !!

 


पंढरपूर : तालुक्यातील खेड भोसे येथील सोसायटीचे कार्यक्षेत्र गावापुरते मर्यादित असताना मतदार मात्र दोन तालुक्यातील ११ गावात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याच विषयावर येथील सोसायटीची निवडणूक गाजताना दिसत आहे. 


खेडभोसे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागली असून आज परिवर्तन विकास विकास आघाडी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.  गावातील सोसायटीची ही निवडणूक असली तरी जोरदार अंतर्गत चुरस असून ३ जून रोजी या निवडणुकीचे मतदान होणार आहे तथापि निवडणुकीच्या आधीच मोठा आक्षेप घेण्यात आला आहे.   खेडभोसे विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यक्षेत्र हे खेडभोसे गाव मर्यादित असताना  चक्क पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील तब्बल ११ गावांमधील सभासद खेडभोसे सोसायटीला संलग्न करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अशी माहिती पुढे आली आहे. निवडणुकीतील एका गटाने तर सदर दोन तालुक्यातील ११ गावात प्रचार करण्यासाठी परवानगी देखील मागितली असल्याची माहिती निवडणुकीतील उमेदवार बंडू पवार यांनी दिली.


सदर संस्थेत एकूण १ हजार २४ सभासद असून खेड भाळवणी, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली, शेवते, पेहे, देवडे, भोसे, व्होळे, अजोती, पंढरपूर, सांगोला येथील ३२५ सभासद करून घेतले गेले आहेत असा आरोप करण्यात येत होता. सदर गावे ही या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे आणि संस्थेचे कार्यक्षेत्र हे केवळ खेड भोसे गावापुरतेच मर्यादित असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काही अटी घालून संस्थेच्या कार्याक्षेत्रापुरतीच प्रचारासाठी परवानगी दिली आहे.  दरम्यान  , मतदार हा स्थानिक असल्याची खात्री करुनच मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उमेदवार बंडू पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यासाठी रहिवाशी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, ७/१२ उतारा, तसेच शासनाचे इतर ओळखपत्र पाहूनच मतदान करू द्यावे, अशी लेखी मागणी केली आहे. 


खेडभोसे सोसायटीचे कार्यक्षेत्र केवळ गावापुरते मर्यादित असून  बाहेरगावातील मतदार मतदानास आल्यास गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडू शकतो, त्यामुळे अशा लोकांवर फौजदारी  कारवाई करावी, अशीही मागणी उमेदवार बंडू पवार यांनी केली आहे. गावाची सोसायटी आणि मतदार मात्र बाहेरचे या विषयावरून ही निवडणूक सुरुवातीपासूनच वादाची आणि चर्चेची ठरताना दिसत आहे . 


आज खेड भोसे येथील ग्रामदैवत बिरोबा, हनुमान मंदिर, जय भवानी मंदिर, गणेश मंदिर, सिद्धेश्वर मंदिर असा विविध ठिकाणी सभांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व. यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप पवार, ग्रामपंचायत माजी सदस्य सिद्धेश्वर रामदास पाटील, माजी सरपंच सिद्धेश्वर पवार, माजी सरपंच राजे राजकुमार जमदाडे तसेच बंडू पवार यांची भाषणे झाली. 


यावेळी इतर गावातील मतदान होऊ दिले जाणार नाही, तसे मतदान करण्याचा कुणी प्रयत्न केला आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा धोका आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी सर्वानीच प्रयत्न करावेत असे मत व्यक्त करण्यात आले. शिवाय विरोधकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला.  परिवर्तन विकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा