Breaking

सोमवार, मे २३, २०२२

देशभरातील रेल्वे एक दिवसासाठी बंद !



नवी दिल्ली : कोरोना कालावधीत काही काळ बंद असलेली रेल्वे पुन्हा सुरु झाली पण देशभरातील रेल्वे ३१ मे दिवशी रुळावर धावणार नाहीत. एक दिवसासाठी देशातील रेल्वे ठप्प होणार आहेत. 


वर्षानुवर्षे अखंडपणे रुळावरून धावणारी रेल्वे कधीही बंद होत नाही. कोरोनाच्या कालावधीत मात्र देशातील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाल्यावर ही रेल्वे पूर्ववत सुरु झाली आणि प्रवाशांची चांगली सोय झाली पण आता पुन्हा देशातील रेल्वे एका दिवसासाठी जागेवरच थांबणार आहे. देशभरातील स्टेशन मास्तर ३१ मे रोजी एक दिवसांच्या संपावर जाणार असून ट्रेन मास्टर्सनी देखील रेल्वे न चालविण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला नोटीस दिली आहे. स्टेशन मास्तरांनी आपल्या काही मागण्या मागितल्या आहेत आणि या मागण्या मान्य न झाल्यास एक दिवसाच्या संपाचा इशारा देण्यात आला आहे.  (Railways across the country closed for one day)सदर संप हा देशव्यापी संप आहे त्यामुळे देशभरातील रेल्वेवर याचा परिणाम होणार आहे. 


पस्तीस हजार मास्तर 

देशात ३५ हजारपेक्षा अधिक स्टेशन मास्तर कार्यरत असून त्यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात असे म्हटले आहे. देशातील रेल्वे स्थानकावर फक्त दोन स्टेशन मास्तर काम करीत असतात त्यामुळे त्यांना आठ ऐवजी बारा तास काम करावे लागते. रेल्वे प्रशासनाने स्टेशन मास्तर पदाची भरती करावी अशी मागणी स्टेशन मास्तर करीत आहेत परंतु शासनाकडून भरती केली जात नाही त्यामुळे स्टेशन मास्तरात असंतोषाचे वातावरण आहे. याच मागणीसाठी आता त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. 


निदर्शने केली पण --

सदर मागणीसाठी स्टेशन मास्तरांनी अनेकवेळा निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वे बोर्डाकडे देखील पाठपुरावा करण्यात आला शिवाय देशभरातील स्टेशन मास्तरांनी मेणबत्त्या घेऊन देखील निदर्शने केली होती परंतु मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे पुन्हा काळे बिल्ले लावून त्यांनी निषेध देखील नोंदवला होता. 


अशा आहेत मागण्या 

रेल्वेतील सर्व रिक्त पदे जलद गतीने भरण्यात यावीत, रेल्वेतील सर्व कर्मचाऱ्यांना कमाल मर्यादेशिवाय नाईट ड्युटी भत्ता देण्यात यावा, स्टेशन मास्तर संवर्गात १ जानेवारी १६ पासून एमएसीपीचा लाभ देण्यात यावा, सुधारित पदानामासह संवर्गाची पुनर्रचना करण्यात यावी, रेल्वे वेळेवर आणि सुरक्षितरित्या धावण्यासाठी स्टेशन मास्तरांना त्यांच्या योगदानासाठी सुरक्षा आणि तणाव भत्ता दिला जावा, रेल्वेचे खाजगीकरण आणि कार्पोटरेशन थांबविण्यात यावे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा